Friday, July 29, 2011

आईच्या काळजाची प्रतिमा

नका  काही  तोडू  माझ्या  जुन्या  घरातलं,
आणि  ते  स्वयंपाकघरही   अगदी  तसंच  राहू  द्या.
तिथे  एक  चूल  आहे  जळणारी,
माझ्या  आईच्या  काळजाची  प्रतिमा.

हवं तर  देवघरही  तोडा,
माझी  त्यालाही  नाराजगी  नाही.
पण  स्वयंपाकघर  नका तोडू ,
माझा  देव  तिथेच  नांदतो.

आज  जरी  तिथे  चूल  जळत  नाही,
पण  राख  आहे  ना  तशीच,
मला  तिची  स्वप्न  नाही  जपता  आलीत,
ती  राख  तरी  तेवढी  राहू  द्या.

तशी  ती  साऱ्याच  घराची  मालकीण,
पण  स्वयंपाकघर   तिचं  खास,
मलातर  तिच्याच  पदराचा  निवारा  होता,
बाकीचं  घर  उगाचच  ताव  मारायचं.

आणि  राहू  द्या  ते  तुळशीचे  रोप,
लोकांकडे  लक्ष्मी  सांजवेळी  येते,
माझी  लक्ष्मी  सकाळीच  तुळस  पूजा  करून,
पहिले  मलाच  दर्शन  द्यायची.


















तो  आतल्या  खोलीतला  काचेचा  तुकडा,
आणि  तो  तुटलेला  कंगवाही   राहू  द्या.
आणि  राहू  द्या  तो  कुंकुवाचा  करंडा,
त्याचा  धनी  येणार  आहे  असं  म्हणायची  ती.

तो  उंबरठा  सुद्धा  राहू  द्या,
आणि  राहू  द्या  ती  रांगोळी  सुद्धा,
पुसू  नका  ती  “श्री  रामअक्षरे,
या  शबरीच्या  मागे  मी  वाट  पाहीन तिच्या  रामाची.


हो  पण  मला  आणून  द्या  ती दोरीवरची  गोधडी,
आणि  ते  तिथलंच  तिचं  पातळही  द्या.
फार  माया  , फार  उब  देखील  आहे  त्यात,
आणि  हिमालय  अंगावर  घेण्याची  ताकद  सुद्धा.

आणि  काय  शोधतायतिच्या  चपला,
त्या  नव्हत्या  कधीच  तिच्याकडे.
अनवाणीच  तुडवायची  वाट  ती  सदा,
आता  तर  दगडंही  मऊ वाटायची  त्या  तळव्यांसमोर.

नाही  शोभलं तरी  राहू  द्या,
माझ्या  नवीन  घरामागे  हे  तिचं  घर.
या  पेक्षा  तिची  चांगली  समाधी बांधायला,
मला  नाहीच  जमणार  कधी.

...अमोल

Friday, July 22, 2011

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर

  image by

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायलाअचानक जाग आल्यावर
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं.
वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.





















तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.
बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.
आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच.

......अमोल


Monday, July 18, 2011

छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....

नको आम्हाला liberalization , privatization , globalization  ..................
छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
ज्यात सुखाने जगण्याची नाहीतर नाही पण सुखाने मरण्याची तरी खात्री द्या.

अहो rocket  science , sapce  science ने कुणाचं भलं करताय.
रेल्व्येच्या गर्दीत जीव जातोयसांगा त्याचं कधी बघताय.
अहो मंगळचंद्र या निर्जीव जीवरहित ग्रहांवर शोधताय तरी काय,
आमच्या धास्तावलेल्या आयुष्यावर काढा काही तरी उपाय.

metro  रेल्वेच्या नावावर आम्हालाच taxes  चा दंड,
आणि पहिल्या पावसात साध्या लोकलचेही signals  बंद.
नको हायफाय सुविधा, निदान साध्यातरी द्या,
छोट्याश्या ओंजळीत जीवन जगण्याची निदान खात्री द्या.

तुम्ही करा diplomacy ते करतायेत bomb  हल्ले,
तुम्ही ठोका भाषणे, इथे सामन्यांचे जीव चाल्ले.
वरून या डिवचायला स्पिरीट स्पिरीट म्हणून,
आम्ही आपलं जगायचं जीवाचा विट मानून.
आणि कसलं स्पिरीट कसलं काय,
अहो पोटासाठीच धावतायेत पाय.

मेल्यानंतर कश्यासाठी जगताना मदत जाहीर करा,
तुमच्या security  ला नाही police त्यांना लढायला माहीर करा.
महागाई, भ्रष्टाचार हे आता habitual  झालंय,
पण हे bomb वैगरे याची सवय नाहीये  आम्हाला,
नाही काही मोठी आशा पण संद्याकाळी पोहचू घरी जिवंत,
निदान याची तरी खात्री द्या.
छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
ज्यात सुखाने जगण्याची नाहीतर नाही पण सुखाने मरण्याची तरी खात्री द्या.

.....अमोल