Saturday, April 6, 2013

माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.....


माझ्या घराला  फक्त तू नवीन नसशील,
नवीन असेल तुझ्यासोबतची, तुझ्याबाबतची प्रत्येक गोष्ट.
नवीन असतील तुझ्या सवयी, नवीन असतील तुझ्या आवडी.
नवीन असतील तुझ्या लकबी, तुझी लाज आणि भावना भाबडी.
नवीन असतील तुझे लेडीज रुमाल लहानसे,
नवीन असतील उन्हातले स्कार्फ चेहऱ्यावर बांधायाचे.
तुझे ते तलम नायलॉन चे , कॉटन चे ड्रेसेस, त्यांचा तो विशिष्ट वास,
कपाटाच्या काचेवर रंगीबेरंगी टिकल्यांची आरास.
खणातली तुझी लिपस्टिक, लायनर, पावडरचा पफ, पर्फुमची बॉटल,
आणि कपाटातली बांगड्यांनी भरलेली नळी जी आजपर्यंत वापरलीच गेली नाही खरंतर.
कपाटात निळ्या जीन्स व्यतिरीक्त इतर सर्व रंग व्हाईट आणि ग्रे,
पण आता नवीन असतील तुझे रंगीत ड्रेसेस, रंगीत ओढण्या, विविध साड्या आणि त्यावरची चित्रे.
प्लेन आणि चेक्स यांशिवाय असतील फारच व्हरायटिस,
पानं , फुलं , नक्ष्या वेगवेगळ्या आणि रंग हि त्यांच्या भरीस.
माझ्या ब्याग शेजारी विसावलेली तुझी पर्स,
आणि किचन मध्ये जातायेता होणारा,
पदड्यावर तू सुकत घातलेल्या ओढणीचा मऊ स्पर्श.  













याचसोबत नवीन असेल वार्डरोबच्या खालच्या कप्प्यात,
वर्तमान पत्रात गुंडाळून ठेवलेल्या तुझ्या त्या दिवसातल्या गोष्टी.
नवीन असतील तुझ्या देवभोळ्या कल्पना,
आणि त्या दिवसातलं ते वागणं तुझं कष्टी.

नवीन असेल पसाऱ्यातली आवराआवर,
वस्तूंना जागा भेटतील स्वतःच्या,
ज्या कधीच जागेवर नसतात आजवर.

नवीन असतील कितीतरी तुझ्या कल्पना,
नाजुकश्या भावना, काही रेशमी संवेदना.
नवीन असेल तुझी नजर एखादी गोष्ट बघायची,
नवीन असेल पद्धत एखद्या विशिष्ट वेळी वागायची,
नवीन असेल काही तर्हा विषय हाताळायची.
काही अल्लडपणा , काही समजूतपणा,
काही मस्तीत  सुचलेलं  तुझ्या वेड्याश्या मना. 

आजपर्यंत "माझ्या"मय असलेल्या या घरा,
"तुझ्या"मय व्हायला वेळ लागेल जरा.
कारण माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.  


.........अमोल 

Monday, April 1, 2013

तू ऑफिस मध्ये नसतांना



वारा असून नसल्यासारखा होता का कुणास ठाऊक,
चेहरा हसून रुसल्यासारखा होता का कुणास ठाऊक.

वारयावर झालाच नाही पावलांचा हळुवार आवाज,
दिवसानेही अमावसेच्या रात्रीचा लाऊन घेतला रिवाज.

सांज  रागावली होती कारण हुरहूर चोरली दुपारने,
सांज निमूट सुन्न कठीण मोकळ्या क्षणांस सारणे,

आज गंध उतरलाच नाही दररोजपरी जमिनीवरी,
श्वास नुसताच चढला उतरला वाटलाच नाही श्वासापरी.













कंटाळून तू  झिडकारते नको असलेली गोस्ट एखादी,
कंटाळ्यालाही गम्मत यावी तू लडिवाळपणे झिडकारल्याची.

आज शब्द ऐकून कुणाचा हसवासच वाटलं नाही,
तू नसशील त्या ठिकाणी असावासच वाटलं नाही.

अस्वथ नजर बिनधास्त होती सैरभर फिरताना,
भीतीच नव्हती तू बघण्याची चोरून तुला बघतांना 

सारं काही तेच,तिथेच, तसंच होतं जसं आधी,
जिवंतपणाचा  अभाव सारा त्यांचा श्वासही तुलाच शोधी.

तुझ्यातल्या ऊर्जेमुळे निर्जीवातही चैतन्य धारण होतं,
आज सारं असून नसण्याला तुझी गैरहजेरी कारण होतं.

..........अमोल 

तुझा शब्द


तुझा शब्द इतक्या हळुवार पडला कानी,
जसं पडावा अंगावर पहिल्या पावसाचं पाणी.

पहिल्यांदा नजर देऊन पहिली कुण्या ओठांची हालचाल,
शब्दच विसरलो त्या नादात अशी होती ती कमाल.

अलवारपणे खालचा ओठ स्पर्शत होता वरच्या ओठाला,
जितक्या अलवारपणे फुल सोडते ओघळताना देठाला.

त्या दोन सुंदर पाकळ्यांनी मनात सुरु केला दाह,
मोक्ष कुणीही सोडून द्यावा इतका मोहक होता तो मोह.

शब्दच माझे विसरून गेले त्यांच्या  अस्तित्वाच्या ओळी,
मौनाचे ऋणही फिटून गेले तू बोलत असते वेळी.

तुझा शब्द संपवत होता कल्पनेतले आणि वास्तवातले अंतर,
शासही स्वताचा ऐकू आला तू निघून गेल्या नंतर.

इतकं पुरेस होतं आता हा उरला जन्म जगण्यासाठी,
जन्मलो तर तीळ बनून जन्मेन  पुन्हा तुझ्याच ओठी.
..........अमोल 


ती बिनधास्त आहे,
तिच्या कर्तुत्वावर ती निर्धास्त आहे.
लढेल कोणत्याही संकटांशी,
इतकं तिच्यात धारिष्ट्य आहे.
ती बिनधास्त आहे.

तिचे विचार नवीन आहेत,
तिच्या कल्पनाही नवीन आहेत,
नवीन स्वप्न साकारण्याचे तिचे मार्गही नवीन आहेत.
तिच्या मनात भरारीचे निर्णय तरीही पक्के आहेत,
जरी पंखांवर पुरोगामित्वाचे अरिष्ट आहे.
ती बिनधास्त आहे.

तिच्या कडेही आहे एक स्त्रीमन,
ज्यात दडलंय एक हळवेपण,
जितक्या सहजपणे जाते office ला,
तितकी सहजपणे सांभाळते kitchen पण.
जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच मित्रही आहेत,
modern असली तरी सांभाळते
जाणीवेने आपुले स्त्रीधन.
मर्यादा ओलांडणार्यांसाठी,
तिच्यावरही चंडीकेचा वरदहस्त आहे.
ती बिनधास्त आहे.

ती थोडी नम्र आहे,
ती थोडी आगावू पोर आहे,
कधी अतिशय शालीन,
कधी दंगेखोर आहे.
घरही सांभाळते, स्वतःसाठीपण जगते,
जाणीवेने सार्या जगाकडे पाहते.
काळजातलं दुख कधी चेहऱ्यावर आणत नाही,
स्वताचा आनंद कधी एकटीचा मानत नाही.
चार गोष्टी सांगते कधी आईसारख्या समजावून,
कधी वागते अगदी वेड्यासारखी आपणहून.
अशी तशी कशी कशी पण जशी आहे तशी फार मस्त आहे.

..........अमोल