Sunday, July 15, 2012

असा पाऊस तसा पाऊस.


त्याच्याकडचा पाऊस

अरे थोड्या वेळ थांब येऊ दे तिला,
कोणीतरी सांगाना या वेड्या पावसाला.

कित्येक दिवसांनी हि भेट होणार,
त्याला सांगा थांबनको येऊ अडवायला.

नेहमी असेच होतेमाझे फसेच होते,
तुला का आवडते असे मला चिडवायला.

किती वेळ गेला असाच कोरडा कोरडा,
आताच सुचले कसे तुला तिला रडवायला.

नकोसनारे होऊ इतका कठोर तू,
तूच कारणीभूत होतास हि प्रीत घडवायला.

एकदाच तिला येऊ दे अन मिठीत  घेऊ दे,
मग नाही सांगणार कधी तुला जायला.

एकाच झाडाखाली निशब्द आम्ही असताना,
ये ना मग खुशाल हवे तसे भिजवायला.

कश्याला फुलवतोस हा निसर्ग सारा,
तुला तरी आवडेल का यात एकटे मिरवायला.

तुझे नावंच सांगतो फक्त येऊ दे तिला,
सांगतो तुझा कान धरून तुला ओरडायला.

अरे प्लीज तिला एकदाच येऊ देरे,
मग ये हवा तसा आणि हवे तितके राहायला.

______________________________________________________

तिच्याकडचा पाऊस

किती रे हा पाऊस कशी बाहेर येऊ,
तूच सांग घराबाहेर कसे पाऊल मी ठेऊ.

हा उलट सुलट वारा उधळतो छत्री,
आणि थांबेल कि नाही याचीही ना खात्री.

तू पण राजा ऐक नको राहूस भिजून,
संपल्यावर मीच येईन धावत इथून निघून.

हा निरोप लिहिल्या कागदाची सोडते हि होडी,
आज भेट नाही यावरच मन गोडी.

शपथ तुम्हा सारिंनो नका भिजवू हि नांव,
तुम्हीच करा सोबत हिला गाठायचे दूर गाव.

तुही कागदा ठेव जपून ह्या अक्षरांची शाही,
त्याला भेटल्याशिवाय बघा विरघळायचं नाही.

शब्दांनो जाऊन तुम्ही समजूत त्याची काढा,
सर्दी होईल म्हणावं त्याला आधी घरी धाडा.

तो जरा हट्टी आहे, त्याला सांभाळून घ्या,
ह्या घडीत दुमडलेले काळीज जपून जरा द्या.

माझ्याही डोळ्यात साचलेल्या आसवांच्या रांगा,
त्याला शपथ आहे जाण्याची इतकं फक्त सांगा.

................अमोल