Friday, January 28, 2011

तो एक वैरागी संन्यासी

तो एक वैरागी संन्यासी,
मी संसारातला हौशी,
तो उभा त्या पलीकडे,
मी उभा या अलीकडे,
दोघांची वाट समांतर,
चालतो मुक्तीची वाट निरंतर.
तरीही दोघांमध्येही अंतर.

त्याकडे रिकामी झोळी,
मजकडे विचारांची मोळी,
तो शोधतो मोकळे आभाळ,
मी आभाळाखाली छप्पर,
तो मुक्त व्हावया बघतो,
मी मोहाची शोधतो खापर.

तो देव शोधतो एकांती,
मज सदैव असते भ्रांती,
त्यास  भूतकाळातली खंत,
ना भविष्याची चिंता.
मी सोडवतो मात्र सारखा,
त्रीकालातला गुंता.

समोर त्याच्या सदा,
चैतन्याचे दिवे.
उडतात माझ्या समोर,
वासनेचे थवे.
अंतरी त्याच्या त्यागाचे,
सदैव पडती सडे.
सुखाच्या माझ्या कल्पनेला,
वारंवार तडे.
विरक्तीची तोरणे सदा,
त्याचा मंडपी चढे.
नात्याची सूक्ष्म जाळी,
पाय माझा आतून आतून ओढे.

त्याच्या जागेवर तो खरा,
माझ्या जागेवर मी बरा.
दोघं चालत राहू वाट,
पूर्वी होती जशी.
तो एक वैरागी संन्यासी,
मी संसारातला हौशी.


.......अमोल

Saturday, January 22, 2011

स्वर व्याकूळतिचा

असा कधीही ऐकला नाही स्वर व्याकूळतिचा,
दिनकर माध्यानी असता किरण असा मावळतीचा.

भय अस्मानी लाटांचे पैलतीरावर होते,
बेभानपणाचे सूत्र माझ्या शिरावर होते,
वारयाशी अडले नाही शीड माझे कधीही.
वल्हवली नाव सदाच मार्ग विसरून परतीचा.

अडवती मज तेव्हा फास खूप मोहाचे,
हृदयस्पर्शी होते भास सभोवाचे,
मी गुंतलो त्या स्वार्थी स्वप्नात केव्हाही.
आकाश गवसण्या तेव्हा गंध विसरलो मातीचा.

ती रात अंधारी आणि वादळ भयावह होते,
पण जिद्दीने जगण्याचे ते माझे वय होते,
लाटान्नाही चिरले त्या धाउनी आल्या जेव्हाही.
लढलो परी रडलो केला सामना त्या रातीचा.

नव्हता रात्रीस तेव्हा दीपस्तंभ उजळणारा,
त्या पाण्यात होतो एकटाच मी जळणारा.
व्यथा तेव्हा माझी ना विचारली कोणीही.
एकू दिला मीही कोणास स्वर माझा काकुळतीचा.

आपलेच होते आधी तोडण्यास आधार,
निंदेस जोर होता लाऊन जिभेस धार,
यशाने पैलतीरावर जाता तेच ओवाळती मज तेव्हाही,
परी जीव रडत होता वरीवरी त्या हसणाऱ्या वातींचा

अमोल

Saturday, January 15, 2011

तुझ्यामुळेच

व्यथित माझ्या भावना,
तुझ्यासमोर कथित झाल्या.
ऐकायला तू होतास म्हणूनच,
त्या साऱ्या श्रुत झाल्या.

चिरंतर होत्या वेदना माझ्या,
नि चिरंतर होते दुखं सारे.
तू आलास जीवनात म्हणूनच,
वेदनाही अमृत झाल्या.

मी भोळी होते गुंतलेली,
नि गुरफटलेली स्वतःतच.
झिडकारल्या अस्तित्वाच्याही कळ्या,
तुझ्यामुळेच स्वीकृत झाल्या.

आकृत पावली स्वप्ने सारी,
सुखावली लोचने हि.
कोमजलेपण दूर सारून,
पाकळ्या फुलण्या प्रेरित झाल्या.

एकली होती सावली मी,
तुझी प्रिया साथ झाली.
तू दिलास हातात हात नि,
संचिताच्या घागरी ओतपोत झाल्या.

माझ्या खुळीच्या कल्पनांना,
कधीच परवानगी ना  मिळाली.
तुझं मांगल्याच लेणं लेऊन,
त्या साऱ्या अधिकृत झाल्या.

आज तूझा विश्वास आहे,
तूच माझा श्वास आहे.
शोकांतिका सरून साऱ्या,
घड्या जीवनाच्या कृतकृत्य झाल्या.

भीती नाही कसली मला,
फिरायला चारचौघात.
तुझी साथ आहे मला,
ह्या गोष्टी सर्वश्रुत झाल्या.

......अमोल

हळवीशी व्याकुळता

नात्याविरहित  आपुलकीचा,
हात जेव्हा झाला मिळता.
सहजच आली ओठांवरी,
हळवीशी व्याकुळता.

लाटेचे कधी नव्हते भय,
पण हरवण्याचे होते वय.
मोह झाला चांदण्यांचा,
नि पडली खुळी चांदणसय.
किनारयावरच तोल गेला,
विश्वासच अबोल झाला.
ऐन पहाटेच्या दाराशी,
मोगरयाचा मोल गेला.
परी बोलले कुणाशीही,
ना कुणा सांगितली व्यथा.

केव्हापासून चालते आहे,
मौन वेडे पाळते आहे.
प्रश्नार्थक चेहऱ्यांची.
नजर सदा टाळते आहे.
ज्ञानेश्वरी वाचणारे,
म्हणती मज हिज अध्याय.
एक हाती वाजे टाळी,
हाच एक मानती न्याय.
विश्वासात आंधळीची,
कशी सांगू मी कथा.

सुगंधाचा उत्सव आला,
तरी फुलले ना मी कळी.
भय स्वप्नातही दाटते,
फुलण्या पाकळी पाकळी.
हा हि ऋतू वाया गेला,
नि पुढचेही जातील वाया ऋतू.
आशा मनी कोणती,
आहे केवळ एक हेतू.
खुडावी ना कळी कोणती,
फुल तिचे होता होता.


......अमोल