Thursday, September 2, 2010

तरुणाई

हेच ते वय असतं,
जिथे कुणाचं भय नसतं.
मोकळी असते स्वप्नातली वाट,
आणि कल्पनाही असते स्वस्त.

नको असते उंच शिखर,
छोटंसं टेकाड पुरेसं असतं.
मन भरून गप्पा मारायला,
जर कुणी असेल मस्त.

याच त्या वयामध्ये,
विश्रांतीला नसतो वेळ.
उमेदीच्या गावावारती,
प्रयत्नांची असते गस्त.

हेच तर ते वय असतं,
जिथे नेमकं मन फसतं.
नजरेतले कळता भाव,
लाडे लाडे गाली हसतं.

नेमकी याच वयात,
कुणी लिहिली ज्ञानेश्वरी,
किंकाळी फोडण्या दिल्ली दरबारी,
कुणी होते पुरे व्यस्त.

याच त्या कोवळ्या वयी,
देशासाठी स्वीकारली फाशी,
कुणी वाचवण्या आपली झाशी,
भय फेकुनी कंबर कसत.

हेच ते वय असतं,
जिथे मन आपलं नसतं.
इथे नेमकी चुकते वाट,
कुणा नेमकं गाव गवसतं.

इथे ना चुकीला शाप असतो,
ना कधी पश्चाताप असतो.
येईल ते भोगण्याला,
इथे खुलं दार असतं.

याच वयात आयुष्याचा,
नेमका लागतो डाव जुगारी.
हुकमी पण नसतानाही,
उद्यासाठी पानं पिस्त.

बेपर्वाई वागण्यात असते,
पण आदर्शांना नसतो विसर.
उनाडकीच्या पंखाखाली,
निरागसतेचं पाखरू वसत.

.......अमोल राणे

No comments:

Post a Comment