Wednesday, September 7, 2011

आता तुटली रे नाळ.


हि कविता त्या कोणी एकाची जो कोणी फार दूर निघून गेला बरंच काही मिळवण्यासाठी,
आणि इतका दूर झाला कि काहीच नाही उरलं पाठी पुन्हा स्वतःच असं गमावण्यासाठी. 
.
.
.
.


इथे नाही वेळ कुणा,
बोलण्यासाठी क्षणभर सुद्धा,
परकी सारी नाती,
आणि परका हा देश सुद्धा,
खोट्या खोट्या ऐश्वर्यासाठी,
सुटले स्वतःचे आभाळ,
आता तुटली रे नाळ.

नाही इथे प्रेम मिळत,
मिळतो फक्त पैसा,
खरी आपुलकीस मुकलो,
जसा जला विना मासा,
सारे मोठे शामियाने,
पण नात्यांची आबाळ,
आता तुटली रे नाळ.

इथे नाही सणवार,
नाही सुखदुखाना आकार,
वास्तव सारे विसरलो,
करताना स्वप्नां साकार,
मनी उरतो फक्त,
एक आठवणींचा गाळ,
आता तुटली रे नाळ.

परतीचे ढग आता,
खुणावतात पुन्हा,
पण देशी जाऊन सुद्धा,
नांदतो जसा पाहुणा,
कुणी नाही उरले तिकडे,
म्हणण्यासाठी बाळ,
आता तुटली रे नाळ.
परतताना पुन्हा पुन्हा,
ओलावतात डोळे,
वाटते कुणी थांबवावे,
पायात येतात गोळे,
पण कुणी नसतं निरोपासाठी,
कुणी म्हणंत नाही सांभाळ,
आता तुटली रे नाळ.

इथेच खितपत पडायचे,
सांभाळायचे इथलेच संस्कार,
दुरूनच करायचा रोज,
स्वतःच्या देशाला  नमस्कार,
सातासमुद्रा पलीकडूनच,
घालायची देवालाही माळ,
आता तुटली रे नाळ.

................अमोल