Tuesday, September 14, 2010

चाकरमानी

आज पुन्हा एकदा आनंदान फुलतलो कोकण मनी,
मायेचो पदर पसारतली कोकणाची भूमी,
भरतला खळा परत दूर गेल्या लेकरांनी,
सुखावतली नव्याने हि परशुरामाची धरणी,
आज पुन्हा एकदा कोकणात जातलो चाकरमानी.

देवाक घालून गाऱ्हाणा सोडल्यान जेव्हा कोकण,
मोठो सागर पार करून थाटल्यान मुंबईत जीवन,
विसकटलो ,भरकटलो किती तरी गाव रव्हलो ध्यानी,
आज पुन्हा एकदा कोकणात जातलो चाकरमानी.

निरोप देतांना घरातल्यांका केल्यान मन घट,
हातात घेतल्यान फक्त, देवाच्या, पायाची मळवट.
"देवाक काळजी" म्हणान भरल्यान डोळ्यात पाणी,
आज पुन्हा एकदा कोकणात जातलो चाकरमानी.

हि मुंबयची तरा लय लय न्यारी,
जेवान कसला.... दिस काढल्यान करून फक्त न्याहरी,
तेव्हा आठवली आउस नि तिच्या हातचा पेजपाणी,
आज पुन्हा एकदा कोकणात जातलो चाकरमानी.

भावाक गावाच्या मिरगाक पैसेच नाय पाठवूक,
ह्याची काय दमछाक होता हयाकाच काय ती ठाऊक.
भाव गावचो रागावलो ह्याना पाठवूक नाय पैसो,
त्यानाव ढकलल्यान नांगर कर्जान कसो बसो.
मुंबईकव गावच्यानी पाठवूक नाय तांदूळ गोटो,
आणि एकमेकांबद्दलचो राग मनात झाला मोठो.
पण दोघा एकाच मायेची पोरा... हात जोडतली देवाच्याच चरणी,
आज पुन्हा एकदा कोकणात जातलो चाकरमानी.

सरलो सारो मिरग जीव धरलो शेतात भातानी,
सरलो श्रावण वेळ इली गणपती येण्याची,
हकडे मुंबईकव सुरु झाली धावपळ गावक जाण्याची,
गावचो भावव वाट बघता चाकरमानी येण्याची.
देवाक सारी काळजी त्याचीच सारी करणी,
एक होतले भाव पुन्हा मिटवून भेद मनी,
आज पुन्हा एकदा कोकणात जातलो चाकरमानी.

भाव उतरलो दारात, जीव नाय थाऱ्यात,
लय दिवसान पाय ठेवल्यान चाकरमान्यान घरात,
भेट झाली भावांची पण शब्द नाय तोंडात,
मोठो होतो पडवीत, बारको होतो खळ्यात,
पण मिठी मारल्यानी चुलत भावांका चुलत भावांनी,
आज पुन्हा एकदा कोकणात इलो चाकरमानी.

गणपतीच्या दिसात दोन भाव झाले एक,
दोघांनी गायली आरती आणि भजना अनेक,
गणपतीचे दिवस सारे सुखात सरले,
कामावरल्या सुट्टीचे वायाचंच दिवस उरले,
सुरु झाली बांधाबांध काजी तांदूळ सूप नि वाडवनी,
परततांना पुन्हा डोळ्यात साठला पाणी,
लहानपण आठवला दोघा भावंडानी,
जत्रेत येतंय जमलाच तर म्हणान पुढे सरलो,
होते नाय होते तेवढे पैसे देऊन मागे फिरलो,
पुन्हा डोळ्यात साठवल्यान घर बांधलेला वाडवडिलांनी,
आज पुन्हा एकदा कोकणातून परततलो चाकरमानी.

दिस सरत गेले, वर्ष सरत गेले,
जीवनाची नाती अखंड हत देवाच्या कृपेनी,
पुढल्या वर्षात गणपतीक जाऊक पैसे जमवता नव्यानी,
आणि मुंबईत पुन्हा एकदा हरावलो चाकरमानी.


खळा :- अंगण
आउस:- आई
मिरग :- पावसाच्या सुरवातीचे दिवस
भातानी :- तांदळाच पिक
पडवी :- घरात बसण्याची जागा
वाडवनी :- विशिष्ट मुठ असलेली झाडू


.....अमोल

Thursday, September 2, 2010

“आई”स्क्रीम

काल मला यायला फारच उशीर झाला.
विरघळलेला आईस्क्रीम तुला एकटीलाच खावा लागला.
आयुष्यातही बरेचसे आनंद तुला विरघळल्यानंतरच भेटलेत.

दिसभर राबणाऱ्या तुझ्या हातांना मी बघतो.
तुझ्या चेहऱ्यावरच्या विरलेल्या आनंदालाही मी बघतो.
सकाळी उठल्यानंतर आसवानी भिजलेल्या उशीलाही बघतोच मी.

तुझ्याही मनात ईच्छा आकांक्षा होत्याच असतील.
मला वाटत मीच साखळी झालो असेन तुझ्या पायाची.
अमावसेला चंद्र आकाशातच असतो, न उगवण्याच वचन आहे म्हणे त्याच.

तुझ्या एकटेपणात तुझ्याशी बोलणारे कुणीच नव्हते.
पण जागोजागी तुला बोलणारे अनेकजण होते.
तुझी चूकच मला अजून कळली नाहीयेय.

माझ्या प्रत्येक जखमेवर तूच औषध आहेस.
पण तुझ्या सर्व जखमा मला कधीच दिसल्या नाहीत.
एका नजरेत पूर्ण सागर बघणे कठीण आहे.

आज तू किती निछींत झोपलीयेस एका अर्भकासारखी.
या आधी झोपतानाही उठण्याची चिंता असायची.
मरणात इतकी शांती असते हे माहित असत तर पहिले थांबवलंच नसत.

तू फार धन्य आहेस, तरी पुढल्या जन्मी तुझ्या पोटी मी नाही येणार.
उगाच कशाला त्या गर्भातल्या, प्रसुतीच्या आणि त्यापेक्षाही वाढविण्याच्या कळा.
त्यापेक्षा तूच माझी घरी जन्म घे, बरीच सेवा राहिलीय अजून.

......अमोल राणे

तरुणाई

हेच ते वय असतं,
जिथे कुणाचं भय नसतं.
मोकळी असते स्वप्नातली वाट,
आणि कल्पनाही असते स्वस्त.

नको असते उंच शिखर,
छोटंसं टेकाड पुरेसं असतं.
मन भरून गप्पा मारायला,
जर कुणी असेल मस्त.

याच त्या वयामध्ये,
विश्रांतीला नसतो वेळ.
उमेदीच्या गावावारती,
प्रयत्नांची असते गस्त.

हेच तर ते वय असतं,
जिथे नेमकं मन फसतं.
नजरेतले कळता भाव,
लाडे लाडे गाली हसतं.

नेमकी याच वयात,
कुणी लिहिली ज्ञानेश्वरी,
किंकाळी फोडण्या दिल्ली दरबारी,
कुणी होते पुरे व्यस्त.

याच त्या कोवळ्या वयी,
देशासाठी स्वीकारली फाशी,
कुणी वाचवण्या आपली झाशी,
भय फेकुनी कंबर कसत.

हेच ते वय असतं,
जिथे मन आपलं नसतं.
इथे नेमकी चुकते वाट,
कुणा नेमकं गाव गवसतं.

इथे ना चुकीला शाप असतो,
ना कधी पश्चाताप असतो.
येईल ते भोगण्याला,
इथे खुलं दार असतं.

याच वयात आयुष्याचा,
नेमका लागतो डाव जुगारी.
हुकमी पण नसतानाही,
उद्यासाठी पानं पिस्त.

बेपर्वाई वागण्यात असते,
पण आदर्शांना नसतो विसर.
उनाडकीच्या पंखाखाली,
निरागसतेचं पाखरू वसत.

.......अमोल राणे