Tuesday, February 14, 2012

न सोडवता आलेला गुंता


आज  दुपारी  वेळ  जात  नव्हता  म्हणून  कपाटातली  जुनी  कंपास बाहेर  काढली,
आणि  मग  college मधल्या  कितीतरी आठवणी  जाग्या  झाल्या.
ते तुटलेलं टोपण,  छोट्या  डब्बीचं ढाकण,
काळवंडलेला  खोडरबर, थोटकी पेन्सील,
छाप पुसटलेली इंचपट्टी, friendship  चे  band ,
आयकार्डची लेस, पिक्चरच, बसच जुनं तिकीट,
कॅन्टीनची  बिलं आणि  किती काय.
आणि  हो  तो  महालक्ष्मी   मंदिरातून आणि  सिद्धिविनायक मंदिरातून,
माझ्यासाठी तू घेतलेले  ते  दोन  धागे,
कामावर जायला  लागल्यापासून या  साऱ्या आठवणी याच कंपासमध्ये बंद केलेल्या,
त्या आज उघडल्या,

ते दोन धागे  एकमेकांत गुंतले  होते,
गुंता  इतका  होता कि  टोकं खेचावीत  तर  मधली  गाठ घट्ट बसायची,
आणि  गाठी  सोडवाव्यात  तर टोकंच  हरवायची,
फार  प्रयत्न केला पण गुंता  काय सुटेचना,
आणि त्या पायी मलाही  काही  सुचेचना,
धागे  तोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

तुझ्या  माझ्या बाबतीत देखील असंच झालं होतं,
दोन अनोळखी धागे एकमेकांत केव्हा  गुंतलो ते कळलंच नाही,
आपल्या  दोघांना जरी वेगळ व्हायचंच  नव्हतं,
पण समाजाला, घरच्यांना ते मान्य  नव्हतं,
त्यांनी तो  गुंता  सोडवू पाहिला तितका गुंता  आणखीनच  वाढत गेला,
तुझी माझी गाठ तितकीच घट्ट होत गेली,
नाना  प्रयत्न झाले पण त्यांनी हार  मानली  नाही,
शेवटी त्यांनी धागे तोडलेच,
किती  गाठी मारून स्वतःला जोडलं आहे  तू  आणि  मी हे  आपल्यालाच  माहिती,
"जात"   या  शुद्र  संकल्पनेवर  थुकावसं वाटून देखील,
त्या समोर झुकावं लागलं याची  खंत  वाटते आज.

मी  ते(निदान) दोन घागे तसेच  ठेवले,
कंपास बंद  केली आणि झोपून  घेतलं,
संध्यकाळी  आमच्या  समाजाचा  मेळावा  आहे  त्यात  जायचं  आहे  "fresh "  होऊन. 


................अमोल

Monday, February 6, 2012

सोय


















तू  फक्त  ओरबडलंस.................. एका  भुकेलेल्या  जनावराप्रमाणे,
मला   त्यात  विवेकी  माणूस  दिसलाच  नाही  कधी.
दिसला  तो  फक्त  वासनांध  राक्षसच.

माझ्या  मऊशार   कोमल   मेहंदीभरल्या  हात्तांना कुरवाळायाचं  सोडून कुस्करलस,
माझ्या नाजुकश्या  पाकळ्यागत   ओठांना तुझ्या दातांनी चिरडलस,
आणि  माझं  कौमार्य  तुझ्या  दांडगट पुरुषपणाखाली भरडलस.

ज्या  नाजूक  गाठी  प्रेमाने  सोडायच्या असतात त्या  तू तोडाव्या  तश्या तोडल्यास,
आणि  वर्षांचा  कुणी  भुकेला  जेवावा तसं खात सुटलास.
जे  पहिल्या  रात्री  तेच  प्रत्येक  रात्री.
मीही  मन  मारून  पडून  रहाते,  समजूतदारपणा  जनावाराकडून कसला  करायचा.

तू  फक्त ओरबडलंस  तेव्हाही जेव्हा मी गर्भार  होते,
आणि  तेव्हाही  जेव्हा  किमान तेव्हा  तरी  जेव्हा  खरच  नको  होतं ओरबाडयला.

इतकं  करूनही  तू  समाजातला  एक  आदर्श नवरा,  आदर्श  पुरुष,  आता  तर  आदर्श बापही होशील.
तुला  तुझा  व्यभिचार  या  आदर्शपणाच्या ओझ्याखाली मुक्तपणे जाऊन  बाजारात करता  येत नव्हता,
आणि  कुणावर  बलात्कार  करण्याची  तुझी ताकदच  नाही  तुझ्या  घाबरटपणामुळे,
म्हणून तू  "लग्न" ही  सोयीस्कर  वाट  निवडलीस.

................अमोल