Thursday, March 31, 2011

माझी गझल -- (वृत्त आणि गणाशिवाय)

मला येत नाही वृत्त आणि गण गझलेचे,
भावनेला आकार देते ती कैफियत मांडतो मी.

जीव जडतो जेव्हा एक एक शेर काळजात जातो,
ललनेसही लाजवेल अशी नजाकत मांडतो मी.

मी मांडतो असे तरी कशाला म्हणू उगाच मी,
वेदना सांगतील त्या शब्दांची वरात मांडतो मी.

कागद आणि शाहीची मला बंधने कसली,
उरातला भाव माझा थेट  तुमच्या उरात मांडतो मी.

कल्पनेच्या कक्षा माझ्या गीतास नका लाऊ,
आजवर जे भोगले त्याची हकीकत मांडतो मी.

राहून गेले जगणे जिवंतपणाच्या शर्यतीत,
मृत्यूस दिल्या चकव्याची शरारत मांडतो मी.

फुलले काही फुलारे अपुऱ्या वसंतात,
काही फुलल्या अंकुरांची दुखापत मांडतो मी.

जगण्याची वेगळी धुंदी गवसली आयुष्याला,
दुख्खात मिजास करण्याची हरकत मांडतो मी.

तुमचाही दर्द शांत होतो खोल काळजातल्या जखमेचा,
तुम्हास रिझवण्यासाठी वेदनांची खिरापत मांडतो मी.

.....अमोल

Monday, March 14, 2011

ती सावरणारी सखी

होता कोणी एक असा जो राज रात्री उशिरा यायचा,
देवास ठाऊक कश्यासाठी तो रोज दारू प्यायचा.
कोणाशीही बोलायचा नाही अगदी शांतपणे यायचा,
तिने दार उघडाच ठेवलेला असायचा..........
तो गुपचूप आत शिरायचा.

एक दिवस ठरवलं आत काय होतंय पाहूया म्हणून,
तर तो शांतपणे झोपला होतं तिच्या मांडीवर डोकं ठेऊन.
ऐकून मग त्याची व्यथा मलाही भरून आलं,
मी समजत होतो काही वेगळच, काही वेगळच घडून गेलं.
मुलांना कळू नये दारूचं म्हणून ती त्यांना लवकर झोपवायची,
पप्पांना खूप कामं असतात अशी कारणं रोज खपवायची.
त्यालाही  सहन होत नव्हत हे हालाखीच जीणं,
कळत होतं वाईट आहे तरी सुटत नव्हत पिणं.
बायको पेक्षाही मैत्रीण म्हणून ती त्याला जवळची होती,
सुख असो दुख असो तिची साथ प्रत्येक वेळेची होती.

तो एकटा पडला होता अचानक जगता जगता,
तिची साथ लाभली होती भरदुपारीच सूर्य ढळता ढळता.
पण तो विसरू शकत नव्हता आई वडील जुनं घर,
दारू पायी जात नव्हता तिथे पण सुटला नव्हता मनी आदर.
तेव्हा तीच त्याला द्यायची आई वडिलांची माया,
कधी सखी म्हणून धरायची डोक्यावरती छाया.
दटावायची नजरेतून दारूसाठी पण पदरात सुद्धा घ्यायची,
बाप म्हणून वागायची कधी वेळेवर आई सुद्धा व्हायची.

दारू सोड म्हणून खूप खूप समजवायची,
तरी तो पुन्हा प्यायचा जेव्हा रात्र व्हायची.
म्हणायचा कळतंय गं सारं पण धीर होत नाही,
तू बाबांसारखं ओरडतेस खरं, पण माहितेय तू बाबा नाहीस.
जेव्हा नात्यातून तुटलो तेव्हा हिनेच जवळ घेतलेलं,
तू उशीर केलास यायला तोवर हिच्यावरच बेतलेलं.
मलाही आवडत नाही हे जळजळणार विष,
पण तूच कर काहीतरी फिरव जादूचं पिसं.
तुला तरी काय दिलंय जगण्यासारखं आजवर,
हिम्मतच होत नाही येण्यास तुझ्यासमोर शुद्धीवर.
तूच सांभाळलं आहे घरकुल अवघं माझं,
किती उपकार तुझे सांभाळतेस सुख दुखातल ओझं.
पण तुझ सुख असेल तर हे सुद्धा सोडून देईन,
पण तू शपथ घे कि रोज ह्या थकल्या जीवाला कुशीत घेईन.
किती वर्ष लोटलीयेत मला कुणी आपलं म्हणतच नाहीये.

असं काहीसं चाललं असतांना आत तिने दार बंद करून घेतलं,
तिला उठताना पाहून मी हि तिथनं निसटत घेतलं.
पण काय ठाऊक त्या रात्री तिने काय जादू केली तिच्या कुशीत,
दुसरया दिवसापासून स्वारी घरी येई अगदी खुशीत.
कुणास ठाऊक तिने त्यावर अशी काय जादू केली,
केवळ तिच्या शब्दांसाठी त्याने दारू सोडन दिली.
त्या दारूच्या नशेपेक्षा तिच्या कुशीत होती कुठली नशा,
बेदुंध बुडाला होता तरी तिथून गवसली नवी दिशा

.....अमोल

Wednesday, March 9, 2011

बघा पटतंय का ?

तो मागतो निर्बुद्धाप्रमाणे बुद्धाकडे,
हातात तलवार घेऊन पंचाशिलाचे साकडे.

असत्य स्विकारतो बऱ्याचस्या छंदाने,
ते सत्य नको असते जे सांगितले विवेकानंदाने.

तोच तो त्यांचा म्होरक्या धर्म जाळणारा,
म्हणतो जन्मावा राम इथे धर्म पाळणारा.

रात्रीस कर्म काळी आणि भोगताना भोग,
गीतेत कृष्णास मागतो नीती आणि कर्मयोग.

शिवरायाच्या जन्माची चर्चा तरी केवढी,
त्यासम वागताना मात्र वळते किती बोबडी.

गांधीबाबा  सच्चा, कोई ना उससे अच्छा |
टोपी पेहनकर उसकी सच बेचे उसीका बच्चा ||

हि कशी विषमता दिसते चहूकडे,
संतांनी पेरलेले संस्कारच पडले तोकडे,

राज्य सांभाळणारेच  नाही मनात शुद्ध,
काय उपयोग तरी जन्मून परत, राम- कृष्ण-बुद्ध,

विवेकानंदानी परदेशातल्या स्त्रीसही मानली भगिनी,
आणि कितीतरी फुलं कुस्करली  इथल्या  नपुंसकानी.

स्वराज्यही बुडाले, लयास गेला हरएक टापू.
तेरे अहिंसापेही हिंसा हुवी माफ करना बापू.

....अमोल

Tuesday, March 8, 2011

चाल तू एकटीच शोध तुझी वाट

HAPPY WOMEN'S DAY !!


चाल तू एकटीच शोध तुझी वाट,
सोड हा किनारा जुना, सोड जुनी गाठ.

सोबती सुख दुखाचे सांग किती होते,
ज्याचे दुख भोगणे त्याने हे नियतीच गाते.
पडलीस अडखळून जेव्हा कुणी दिला हात,
संकटे तुझ्या पदरीची तूच कर मात.

वेळ वेडी एकटीच शोधते आधार,
वाटेतच पडते सोसते पावलांचा भार.
राहलीस सदा उपेक्षेच्या अंगणात,
ह्या खोट्या दरबारात कशी तेवेल लाजेची ज्योत.

नवे जग नवे युग हो स्वतः मोकळी,
रडलीस एकटी जेव्हा होते का कुणी त्यावेळी,
तोड जुन्या साखळ्या सोड जुनी कात,
भास आता नित्य नवी झेप घे प्रकाशात.

खंबीर हो अशी ,अजून गेली नाही वेळ,
नवनिर्मिती सोसण्याचे केवळ तुझ्या अंगी बळ,
कठोरता दे नाजूक पापण्यांना शोध कुणी केला घात,
सांग झंकार नाही खंकार तुझ्या कंगणात.

.....अमोल