Saturday, April 6, 2013

माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.....


माझ्या घराला  फक्त तू नवीन नसशील,
नवीन असेल तुझ्यासोबतची, तुझ्याबाबतची प्रत्येक गोष्ट.
नवीन असतील तुझ्या सवयी, नवीन असतील तुझ्या आवडी.
नवीन असतील तुझ्या लकबी, तुझी लाज आणि भावना भाबडी.
नवीन असतील तुझे लेडीज रुमाल लहानसे,
नवीन असतील उन्हातले स्कार्फ चेहऱ्यावर बांधायाचे.
तुझे ते तलम नायलॉन चे , कॉटन चे ड्रेसेस, त्यांचा तो विशिष्ट वास,
कपाटाच्या काचेवर रंगीबेरंगी टिकल्यांची आरास.
खणातली तुझी लिपस्टिक, लायनर, पावडरचा पफ, पर्फुमची बॉटल,
आणि कपाटातली बांगड्यांनी भरलेली नळी जी आजपर्यंत वापरलीच गेली नाही खरंतर.
कपाटात निळ्या जीन्स व्यतिरीक्त इतर सर्व रंग व्हाईट आणि ग्रे,
पण आता नवीन असतील तुझे रंगीत ड्रेसेस, रंगीत ओढण्या, विविध साड्या आणि त्यावरची चित्रे.
प्लेन आणि चेक्स यांशिवाय असतील फारच व्हरायटिस,
पानं , फुलं , नक्ष्या वेगवेगळ्या आणि रंग हि त्यांच्या भरीस.
माझ्या ब्याग शेजारी विसावलेली तुझी पर्स,
आणि किचन मध्ये जातायेता होणारा,
पदड्यावर तू सुकत घातलेल्या ओढणीचा मऊ स्पर्श.  

याचसोबत नवीन असेल वार्डरोबच्या खालच्या कप्प्यात,
वर्तमान पत्रात गुंडाळून ठेवलेल्या तुझ्या त्या दिवसातल्या गोष्टी.
नवीन असतील तुझ्या देवभोळ्या कल्पना,
आणि त्या दिवसातलं ते वागणं तुझं कष्टी.

नवीन असेल पसाऱ्यातली आवराआवर,
वस्तूंना जागा भेटतील स्वतःच्या,
ज्या कधीच जागेवर नसतात आजवर.

नवीन असतील कितीतरी तुझ्या कल्पना,
नाजुकश्या भावना, काही रेशमी संवेदना.
नवीन असेल तुझी नजर एखादी गोष्ट बघायची,
नवीन असेल पद्धत एखद्या विशिष्ट वेळी वागायची,
नवीन असेल काही तर्हा विषय हाताळायची.
काही अल्लडपणा , काही समजूतपणा,
काही मस्तीत  सुचलेलं  तुझ्या वेड्याश्या मना. 

आजपर्यंत "माझ्या"मय असलेल्या या घरा,
"तुझ्या"मय व्हायला वेळ लागेल जरा.
कारण माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.  


.........अमोल