Saturday, November 30, 2013

मी तुझा विटाळ साधा.

नाळ तोडलीस तरी,
जिवंत बेंबी अजून.
मी तुझ्यातून जन्मल्याची,
ती एक नंगी खून.


वाऱ्यासही ना जमले,
तू तिथे स्पर्शू दिले.
ओठांनी जे चाखिले,
ती तुझे दुध पहिले.


रक्त आटवून लाल,
घट भरती शुभ्रपणाचे.
अमृत भेटे ज्यालात्याला,
ज्याच्यात्याच्या अधिकाराचे.


पहिले पाजलेस दुध,
मग भरविलेस हातांनी.
मी मोठा होताच आज,
मोकळी दूर लोटुनी.


आज ओठांस लुचण्याचा,
नाही विचार वेडा.
तू आई मी बाळ,
तरी उभ्या कठोर मर्यादा.


मी द्वंद अवस्थेत उभा,
व्यभिचाराच्या बाजारात.
कुण्या कामाक्षीचा उर स्पर्शता,
थेंब दुधाचा कल्लोळे रक्तात.


तुझी आठवण येता,
गळते पुरुषीपण घाणेरडे.
तू ती अनुसूया जिथे,
लोळती त्रीमुर्तीही नागडे.


स्मरण तुझ्या दुधाचे,
असे मिटणार नाही.
तू तोडलीस नाळ तरी,
बेंबी बुझाणार नाही.


तू ती पवित्रता जिने,
बांधले पदरात वेदा.
मी शापित अपवित्र,
तुझा विटाळ साधा.

..........अमोल

Saturday, October 5, 2013

समजूत

हि कविता नाही,
माझी आसवं आहेत.
परिस्थितीला भिउन,
कवचाखाली मान घातलेली,
भ्याड कासवं आहेत.

हि अक्षरांची फसवेगिरी,
संपूर्ण ध्यानात आहे.
सर्वच बाजूने फसलेला मी,
त्यांच्याशी तरी का लढू?,
माझी तलवार म्यानात आहे.






















मी लढू तरी कुणाशी ?,
मला उराशी ज्यांनी घेतले!!!.
परी माझा उर ना कळला त्यांना,
फसवा समजुनी मला,
दूर त्यांनी फेकले .

दाद मागु कुठे मी,
पडसाद हरवले सारे.
न्याय देणारे हि त्यांचेच,
आरोपही त्यांचेच,
माझ्यवर उगाच करडे पहारे.

समजवणारेच भेटले,
समजून घेणारे कुणीच नाही.
दूषणं लाऊन घेतली स्वतःला,
स्वताच्याच समजल्या त्या चुका,
ज्यांचा मी धनीच नाही.

……… अमोल

Sunday, August 25, 2013

असे जगावे आयुष्य कि,
आयुष्याची मजा यावी .
आयुष्यातून कंटाळ्याने,
आयुष्यभराची रजा घ्यावी .

आजंच  आता जगू,
उद्याचं काय ते उद्या बघु.
चिंता जावी अशी काही विसरून,
जसे फुल नकळत गळावे देठापासुन.
हि अवस्था मनाची  इतक्या सहजा व्हावी.













मनात उल्हासाचे इंद्रधनू,
पसरत राहावे क्षणोक्षणी.
आपला उत्साह पाहून,
आनंद व्हावा फुलाच्या मनी.
चैतन्याच्या बेरजेतून उदासीनता वजा व्हावी.

अमोल 

Sunday, June 2, 2013

तू असताना सोबतीला मला कसली भीती

कठीण  आहे  खडतर आहे  वाट  आयुष्याची,
तू  असताना  सोबतीला  मला  कसली  भीती.

नको  मला  सुख्ख  नवेनको  दुख्ख  नवे,
तू  बघावेस   हसणे  माझे, तूच  बघावी  आसवे,
आणखी  काय  मला  हवे  तू  असतांना  सवे,
तू  करावीस  साथ  नेहमी  श्वास  करतो  जशी.

चालतांना  मी  उन्हातून  तू  धरावा  पदर,
गारठलेलो  असताना  द्यावी  उबदार   नजर,
एकांतात  मी  असताना  हवीस  तू  हजर,
आणि  मग  आपुलकीने   घ्यावेस  मला  कुशी

मी  चुकल्यावर  वाट  माझी  मला  थांबवावे,
ओरडावे  प्रेमाने  कधी  समजावून  सांगावे.
शपथ  घालून  प्रेमाची  मला  बांधून  ठेवावे,

शिकवावे  जगणे  जसे  आई  शिकवायची  तशी.

....अमोल

Saturday, April 6, 2013

माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.....


माझ्या घराला  फक्त तू नवीन नसशील,
नवीन असेल तुझ्यासोबतची, तुझ्याबाबतची प्रत्येक गोष्ट.
नवीन असतील तुझ्या सवयी, नवीन असतील तुझ्या आवडी.
नवीन असतील तुझ्या लकबी, तुझी लाज आणि भावना भाबडी.
नवीन असतील तुझे लेडीज रुमाल लहानसे,
नवीन असतील उन्हातले स्कार्फ चेहऱ्यावर बांधायाचे.
तुझे ते तलम नायलॉन चे , कॉटन चे ड्रेसेस, त्यांचा तो विशिष्ट वास,
कपाटाच्या काचेवर रंगीबेरंगी टिकल्यांची आरास.
खणातली तुझी लिपस्टिक, लायनर, पावडरचा पफ, पर्फुमची बॉटल,
आणि कपाटातली बांगड्यांनी भरलेली नळी जी आजपर्यंत वापरलीच गेली नाही खरंतर.
कपाटात निळ्या जीन्स व्यतिरीक्त इतर सर्व रंग व्हाईट आणि ग्रे,
पण आता नवीन असतील तुझे रंगीत ड्रेसेस, रंगीत ओढण्या, विविध साड्या आणि त्यावरची चित्रे.
प्लेन आणि चेक्स यांशिवाय असतील फारच व्हरायटिस,
पानं , फुलं , नक्ष्या वेगवेगळ्या आणि रंग हि त्यांच्या भरीस.
माझ्या ब्याग शेजारी विसावलेली तुझी पर्स,
आणि किचन मध्ये जातायेता होणारा,
पदड्यावर तू सुकत घातलेल्या ओढणीचा मऊ स्पर्श.  













याचसोबत नवीन असेल वार्डरोबच्या खालच्या कप्प्यात,
वर्तमान पत्रात गुंडाळून ठेवलेल्या तुझ्या त्या दिवसातल्या गोष्टी.
नवीन असतील तुझ्या देवभोळ्या कल्पना,
आणि त्या दिवसातलं ते वागणं तुझं कष्टी.

नवीन असेल पसाऱ्यातली आवराआवर,
वस्तूंना जागा भेटतील स्वतःच्या,
ज्या कधीच जागेवर नसतात आजवर.

नवीन असतील कितीतरी तुझ्या कल्पना,
नाजुकश्या भावना, काही रेशमी संवेदना.
नवीन असेल तुझी नजर एखादी गोष्ट बघायची,
नवीन असेल पद्धत एखद्या विशिष्ट वेळी वागायची,
नवीन असेल काही तर्हा विषय हाताळायची.
काही अल्लडपणा , काही समजूतपणा,
काही मस्तीत  सुचलेलं  तुझ्या वेड्याश्या मना. 

आजपर्यंत "माझ्या"मय असलेल्या या घरा,
"तुझ्या"मय व्हायला वेळ लागेल जरा.
कारण माझ्या घराला फक्त तू नवीन नसशील.  


.........अमोल 

Monday, April 1, 2013

तू ऑफिस मध्ये नसतांना



वारा असून नसल्यासारखा होता का कुणास ठाऊक,
चेहरा हसून रुसल्यासारखा होता का कुणास ठाऊक.

वारयावर झालाच नाही पावलांचा हळुवार आवाज,
दिवसानेही अमावसेच्या रात्रीचा लाऊन घेतला रिवाज.

सांज  रागावली होती कारण हुरहूर चोरली दुपारने,
सांज निमूट सुन्न कठीण मोकळ्या क्षणांस सारणे,

आज गंध उतरलाच नाही दररोजपरी जमिनीवरी,
श्वास नुसताच चढला उतरला वाटलाच नाही श्वासापरी.













कंटाळून तू  झिडकारते नको असलेली गोस्ट एखादी,
कंटाळ्यालाही गम्मत यावी तू लडिवाळपणे झिडकारल्याची.

आज शब्द ऐकून कुणाचा हसवासच वाटलं नाही,
तू नसशील त्या ठिकाणी असावासच वाटलं नाही.

अस्वथ नजर बिनधास्त होती सैरभर फिरताना,
भीतीच नव्हती तू बघण्याची चोरून तुला बघतांना 

सारं काही तेच,तिथेच, तसंच होतं जसं आधी,
जिवंतपणाचा  अभाव सारा त्यांचा श्वासही तुलाच शोधी.

तुझ्यातल्या ऊर्जेमुळे निर्जीवातही चैतन्य धारण होतं,
आज सारं असून नसण्याला तुझी गैरहजेरी कारण होतं.

..........अमोल 

तुझा शब्द


तुझा शब्द इतक्या हळुवार पडला कानी,
जसं पडावा अंगावर पहिल्या पावसाचं पाणी.

पहिल्यांदा नजर देऊन पहिली कुण्या ओठांची हालचाल,
शब्दच विसरलो त्या नादात अशी होती ती कमाल.

अलवारपणे खालचा ओठ स्पर्शत होता वरच्या ओठाला,
जितक्या अलवारपणे फुल सोडते ओघळताना देठाला.

त्या दोन सुंदर पाकळ्यांनी मनात सुरु केला दाह,
मोक्ष कुणीही सोडून द्यावा इतका मोहक होता तो मोह.

शब्दच माझे विसरून गेले त्यांच्या  अस्तित्वाच्या ओळी,
मौनाचे ऋणही फिटून गेले तू बोलत असते वेळी.

तुझा शब्द संपवत होता कल्पनेतले आणि वास्तवातले अंतर,
शासही स्वताचा ऐकू आला तू निघून गेल्या नंतर.

इतकं पुरेस होतं आता हा उरला जन्म जगण्यासाठी,
जन्मलो तर तीळ बनून जन्मेन  पुन्हा तुझ्याच ओठी.
..........अमोल