Sunday, December 25, 2011

अनोळखी


मी  माझ्यातच  गुंतलेला,
तरी  बेभान  सुटलेला,
माझे  गीत  गाण्यासाठी,
नव्याने  कंठ  फुटलेला.

मीच  मला  सुचलेला,
तरी  हि  ना  रुचलेला,
जीवनाच्या  वजाबाकीतून,
स्वतःला  वेचलेला.

मी  स्वतःशीच  रुसलेला,
मी  स्वतःवर  हसलेला,
जगण्याच्या  शब्द  देऊन,
स्वतःशीच  फसलेला.

मी  माझ्यातच  बुझलेला,
नवा  कोंब   रुजलेला,
एकट्या  माळरानी,
एकांताने  गजबजलेला.

मी  तोच  विरलेला,
मीच  तो  हरलेला,
नव्या  या  ऋतूत,
नव्याने  बहरलेला.

मी  तोच  जुना,
मीच  तो  नवा,
कंटाळ्याची  वाट  कधी,
कधी  सोबतीचा  थवा.

मी  तोच  शहाणा,
मीच  तो  दिवाना,
जुनेच  जीवन  नव्याने,
जगणारा  केविलवाणा.

मी  तेच  गात्र,
मी  जुनेच  पात्र,
पाऊस  जरी  नवा  हा,
वाहणे  तसेच  मात्र.

मीच  माझी  आशा,
मीच  माझी  निराशा,
मीच  अंधार  माझा,
मीच  माझा  कवडसा.

मी  रोग  मला  जडलेला,
मी  भोग  जुना  सडलेला,
जीवनाच्या  आकांताने,
माझ्यावरतीच  चिडलेला.

मी  मातीमी  वायू,
मी  आगपाणीआकाश,
मी  शून्यमी  टिंब,
मी  एक  नश्वर  भास.

मीच  माझा  श्वास,
माझाच  मला  फास,
मृत्युच्या  वाटेवरती,
जिवंतपणाचा भास.

मी  दिशांचा  भरकटलेला,
मी  विचारांचा  खरकटलेला,
मी  त्याच  जुन्याश्या,
चालींचा  मळकटलेला.

मी  किनारा  नदीचा,
वा  झरा  त्या  आधीचा,
आज  जरी  मी  समुद्र,
तरी  थेंब  पूर्वी  कधीचा.

मी  असा  मी  तसा,
ना  जाणो  मी  कसा,
माझ्यातच  राहून  मी,
मलाच  ना  ओळखणारा  फारसा.     

................अमोल

Wednesday, December 14, 2011

रावण प्रकटला
काल  माझ्यासमोर रावण  प्रकट  झाला,
विचारत  होता  आता  राम  कुठे  गेला.
सांगत  होता " जरी  मी  सीतेला  नेलं असेल उचलून,
पुन्हा  हात  नाही  लावला  मन  तिचं डावलून.
पण  दिवसाढवळ्या आज  स्त्रीसंगे  नको  ते  होतं,
आता  बरं  हे  सारं  त्या  पुरुषोत्तम रामाला  पहावतं.
आता  का  नाही  उभी  करत  कायद्याची  वानरसेना,
का  नाही  उभा  चिरत  तो  या  बलात्कारयानां.
त्याला  म्हणावं जर  का  देणार  नसशील यांना फाशी,
तर  मग  दे  मला  माझी  लंका  पूर्वी  होती  तशी.
रामायण  काय  फक्त  धर्माच्या  नावावर मिरवायला  आहे,
म्हणावं  ते  कर्माकर्मात  भिनवायलागिरवायला आहे.
कसं  काय  तुम्ही  बलात्कारयानां  रावण  म्हणू  शकता,
मंदोदरी  गर्वाने  म्हणते  यांपेक्षातर माझा  रावणच बरा होता".

................अमोल

Wednesday, December 7, 2011

श्रद्धा
मी हि आस्तिक होतो,
माझीही नितांत श्रद्धा होती.
मी चूक केली अपेक्षेची,
नशिबात  उपेक्षेचीच रेष बहुधा होती.

मला  जे भेटले काही,
सांगण्यात आले की हा संचिताचा भाग आहे.
तू दिलेच काय देवाला ? याचा हिशेब सांग,
इथे श्रद्धा हि महाग आहे.

ते म्हणतात पाप पुण्याचं गणित होतं,
जगण्या साठी श्वास सुद्धा मोजून मिळतो.
सगळं काही ठरलेलं असतं आधीच,
आणि मृत्यू देखील वेळ योजून येतो.

मी कर्मयोगाचा भक्त आहे,
प्रयत्नवादातच  मी देव मानतो.
इथे मिळकतीला संचित म्हणतात,
आणि जो तो अप्राप्तालाच दैव म्हणतो.

हरेक हतबल आहे नियतीसमोर,
तिचं सोडा हो! ती फार गहन नि विशाल आहे.
इथे स्वताशी तरी कोण लढतय,
शरणागती पत्करतोय खुशाल आहे.

छान पांघरून  घालून ठेवलंय देवाला,
अज्ञानाच, आंधळेपणाच नि आळसाच.
गाभार्यात जायचीही तसदी नको असते,
म्हणून धन्य होतात दर्शन घेऊन कळसाच.

मला वाटत नाही हे खरं असेल,
कि देव नास्तीकांवर रागावलाय.
एकमेकांना दोष न देण्याचा तोंडी करार झालाय आमचा,
लेखीही करायचाय, पेपर मागवलाय.

ऐकलय कि देव हि कंटाळलाय या थोतांडाला,
त्याला हि चीड येते खोटेपणाची.
पण तरीही उभा आहे कमरेवर हात ठेऊन,
वाट बघतो आहे आणि एका तुकारामाची.


................अमोल

Thursday, December 1, 2011

दोन सूर्य (सावरकर आणि गांधी)...... विरुद्ध टोकाचे


अगदी  द्विधा  अवस्था  झालीय  माझी,
मला  सावरकरही  पटतात  आणि  गांधीसुद्धा,
एका  ठराविक  वाटेपर्यंत  दोघंही   एकाच  मार्गाने  चालतात  तोवर  ठीक  असतं,
पण, एखाद्या  विशिष्ठ वळणावर दोघंही  आपला  मार्ग  बदलतात,
माझी खरी ओढाताण तेव्हा  होते.
माझी  लायकी  या  दोघांबरोबरही चालण्याची  नाही,
मी  फक्त  माझी  सोय  बघत  असतो  आणि  आजवर  तेच  करत  आलोय.
खरतर यांच्या नुसत्या सावलीखाली आपलं अख्ख  विश्व विश्रांती घेईल,
कारण त्यासाठी  यांनी कोटी कोटी तेजाचे  सूर्य  त्यांच्या  ज्ञानात, कर्मात रुजावलेयत.
त्यामुळे  यांची  सावली  काय  हे  स्वतः एकप्रकारे  सूर्य  आहेत,
आणि  त्या  प्रकाशात  आपण  जगत  आहोत  डोळे  बंद  करून,
कारण  उघड्या  डोळ्यांना तो  प्रकाश  सहनच  होणार  नाही,
ना  सावरकरांचा ना  गांधींचा.

................अमोल