Friday, December 31, 2010

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लागली चाहूल नव वर्षाच्या आगमनाची,
जुने विसरून सारे धावणारी आशा मनाची.
रोज तेच जीवन, तीच नाती,
तीच नोकरी, तेच साथी.
पण तरी असतात मनी विश्वासाचे दोर हाथी,
याच विश्वासाने जगायची असते  कंटाळवाणी घडी जीवनाची.
कधी थकवा जाणवतो, क्षीण येतो सार्यांचा,
आणि मनात जाळ उठतो मग जुन्या आठवणींचा,
ती केलेली मजा, एकत्र घालवलेले क्षण,
कधी हसत गेलेले, कधी फिस्कटलेले क्षण,
आणि हेच पुन्हा चेतना  देतात नव काही जगण्याची.
जुनं वर्ष गेलं तसं पुढलही जाईलच.
आणि शांत आपण बसल्यावर एकदा तरी सर्वांची आठवण येईलच.
आता जरी आहोत आपण नव्या आयुष्याच्या  वळणावरती,
तरी देवा कडे एकच विनंती न विसर पडू दे आम्हा एकमेकांचा कधी,
आस मनात ताजीच असावी एकमेकांना भेटण्याची.


नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

अमोल

Tuesday, December 21, 2010

ओढ

कोणतीही ओढ लागली या मना,
येणाऱ्या वाटेकडे पाहतो हा कुणा,
बदललेले भाव सारे बदललेल्या संवेदना,
बदललेले विश्व मनीचे बदलल्या खुणा,
भांबावते मन राहत नाही भाना,
कळते तुला जरी मलाही सांगना.

अलगद निसटून जातो मुठीतून माझ्या,
अलवार शिरू पाहतो मिठीत कुणाच्या,
नव्हत्या अश्या तऱ्हा पूर्वी या मनाच्या,
नव्हत्या अश्या कधीच अधिरश्या, बेभानश्या.

अजानते स्वर, अजानते हे सूर,
हि सरगम हि नवीनवेली फुलते वेळीअवेळी,
रूप हि अजानते केवळ फसवे भास हे,
फुलल्या तरी मनी या किती अबोली...... किती चमेली.

हा वेगळा अनुभव आहे हि वेगळी प्रचीती,
पुसटसे बिंब केवळ उमटते चित्ती,
नावही नसे ठावे, ठाऊक नसे कि कोण आहे,
पण माझ्या एकांतात केवळ त्याची खुमार राहे.

त्याची हि अवस्था होते का अशी,
तोही झुरतो का रोज अधीर मनाशी,
होईल भेट जेव्हा कळेल का त्याही,
कि आहोत जवळीच आणि भेटही होत नाही.

हीच जाग सदा होते अंतरी,
मी नाही एकटा सोबत आहे कुणीतरी,
भेट होईल आज वा उद्या ना तरी,
भेटतील हे दोन जीव या प्रीत सागरी.

......अमोल

Thursday, December 16, 2010

बिझी बाबा

बालपणीच्या व्यथा:

तुला कधी भेटलाच नाही का रे  वेळ माझ्यासाठी,
आणत राहिलास फक्त नवे नवे खेळ माझ्यासाठी.

आईच्याच पदराची सदा होती माया माझ्यावरी,
तू दिसभर खंगून जमवत होतास मरगळ माझ्यासाठी.

बघ आठवतं का कधी घेतलस मला खांद्यावरी,
घरी आलास का संध्याकाळी कधी सरळ माझ्यासाठी.

पुरवत होतास सारं काही चुकता बेहीशेबही,
मिरवाव खांद्यावरून कधी वाटली का तळमळ माझ्यासाठी.

मी बसून असायचो लाऊन आस, सांजेला दाराकडे,
पण नीट बघायलाही नसायचं तुझ्याकडे बळ माझ्यासाठी.

जाणीवेच्या उंबरठ्यावर:

आता मला सवय झालीय तुझी असूनसुद्धा नसण्याची,
पण टोचते मनात तू भोगलेली हर कळ माझ्यासाठी.

मी फिरतो आता वाटेवरी फुलांच्या मखमालींच्या,
सावलीत ठेऊन मला, सोसलीस उन्हाची झळ माझ्यासाठी.

 निर्वाणीच्या वेळी :

तुझ्याशी खूप बोलायचंय, तुझही खूप ऐकून घ्यायचय,
निदान भांडण्यासाठी तरी काढना एक संध्याकाळ माझ्यासाठी

मला आता पंख फुटलेत, तुझी शरीरही शांत झालंय,
मोकळ्या आभाळात जाणवते तू सहन केलेली होरपळ माझ्यासाठी.

.......अमोल

Wednesday, November 3, 2010

अरे साई नाथा

पुरे झाले आता अरे साई नाथा,
तुझ्यावीण त्राता मला कोणी नाही.

मला कोणी नाही वेगळी देवता,
तूच विधाता तुझ्या चरणी माथा.
चालत आलो तुझिया दर्शना,
स्वीकारुनी घे हा देहाचा चोथा.

जाती धर्माची अडसरे सारी,
मला फक्त प्यारी तुझी द्वारकामाई.
तूच माझी आई तूच माझा ताता,
तुझ्या इतकी ममता कुणा पास नाही.

तुझ्या भोवताली बडव्यांचा फास,
तू नसशी शिर्डीला मला होई भास.
तुझा संग नाही उरला सभोव,
अश्या जगण्याचा मला नाही मोह.
गुप्तरूपे तू वावरशी भक्तात,
येत संकटे तू सावरशी भक्ता.

तुझी श्रद्धा सबुरी कुणा नाही प्यारी,
एका मालकाची जाण रिती झाली सारी.
फकीर रुपात तू योगीवंत राजाधिराज,
खोट्या मायेचा तुला चढविती साज.
खरा भक्त झाला चरणाहून दूर,
अभाविकांचा आहे तुझ्याचारणी पूर.
तुझे नाव गातो श्वास येता जाता.

तुझ्या पायरीशी माझी सोयरी,
झाली तयारी माझ्या मनाची.
तुझ्या वरली शाल जणू कि आभाळ,
त्याच्या इतकी माया नाही कुणाची.
रिकामी दिवे पाण्याने पेटवितो,
असा गुण फक्त तुझिया हाता.

तुझ्या शिरडीला मी येणार नाही,
तुझ्या वाचून मन कुणा देणार नाही.
तूच ये धाउनी माझी अवस्था पाहुनी,
विठ्ठलाच्या परी पुंडलिका घरी,
नाही तर कर दुरी तुझ्या रक्षकांना,
रक्षक नव्हे त्या राक्षसांना.


तुझ्या दर्शनाची मागतो भिक,
चरणे न्याहाळता जिवन सार्थक.
इतके गाऱ्हाणे एक तू भक्तांचे,
तुझ्यावीण शिर्डीला कुणी ऐकत नाही.

.....अमोल

मी मोठा झालो...

आपण वयाने, बुद्धीने जेव्हा मोठे होतो तेव्हा नकळत अहंकार मोठा होत असतोच आणि त्याची पाऊले कधीतरी घरातल्या भांडणात जाणवतातच. आपण जेव्हा त्रयस्तपणे या गोष्टीकडे बघतो तेव्हा आपली चूक आपल्याला कळते, पण फार थोड्या लोकांकडेच असे स्वतःला न्याहाळण्याची कला अवगत असते अश्याच एका मनाची आणि स्वताला सुधारण्यासाठी चालू असलेल्या धडपडीची कविता.

मी मोठा झालो याची मला जाण आली.
"मी"पणाची माझ्या आज वर मान झाली.

मी आता समर्थ झालो स्वतःला पोसायला,
गरज नाही कुणाची व्यथा माझी सोसायला.
वाढत्या गर्वापुढे नीतीची तलवार म्यान झाली.

आवडी बदलल्या माझ्या, निर्णय माझे मीच घेतो,
पडलो तरी रडणार नाही याची स्वताला हमी देतो.
बेपर्वाईच्या पावसात काया झाली गुमान ओली.

उडू लागलो मुक्त आकाशी पंख फुटल्यामुळे,
गुरुर मजला श्वाशात बंध सुटल्यामुळे.
अहंकारातच बुद्धीही दिनरात रममान झाली.

आजपर्यंत वाढलो ज्यांचे धरून बोट मी,
विसरून त्यांना भरतो स्वतःचे पोट मी.
माझ्यावरल्या संस्कारांची सावलीच बेईमान झाली.

.....अमोल

Tuesday, October 12, 2010

हरणे म्हणजे सरणे नाही

हरणे म्हणजे सरणे नाही,
बरंच काही असतं बाकी.
एखाद्याच अपयशाने,
व्हायचं नाही एकाकी.

जिंकणारा  असतो एकटाच,
हरणाऱ्या सोबत सोबती.
सूर्य नाही बनता आले,
तरी चंद्र म्हणून उजळावे राती.

जरा घेतला विसावा,
म्हणजे काही दमलो नाही.
आयुष्य अखंड सराव आहे,
म्हणून विजयात रमलो नाही.

हरणेच देते पुन्हा संधी,
बरेच काही सुधारण्यासाठी.
नव्याने लढून लढाई,
विजयाची गुढी उभारण्यासाठी.

तिथेही पुन्हा हरलास तरी,
हिरमुसून जाऊ नकोस.
जिंकणाऱ्याला शुभेच्छा दे,
तिथेही मागे राहू नकोस.

जगताना जगावे असे कि,
मेल्यानंतरही रहावे काही.
आयुष्य हे सुंदर आहे,
त्याचा शेवट हे मरणे नाही.

.....अमोल

Monday, October 11, 2010

कहा ले चली जिंदगी

कहा ले चली जिंदगी,
कहा चला उम्र का कारवा,
बिते दिनो मी डुबा जाये,
उडत्या मनाचा पारवा.

क्षण हळवे गतकाळातील,
काही सुखाचे काही दुखातील.
कुणी देई अंगी शिरशिरी,
कुणी सुखदसा गारवा.

किती चाललो संकटातूनी,
जरी पडलो तरी उठतो त्यातुनी.
सोडून आलो अपेक्षा ज्या,
तिथे जाई मनाचा पारवा.

कधी वाटेवर थांबलो नाही,
चला अकेला मार्ग पे राही.
उजेड ना दिशांत दाही,
केवळ अंधाराचा मारवा.

धन, दौलत नि संपत्ती,
उद्या अचानक सारे सरती,
जपली मी माणसे केवळ,
त्या आठवणी करती हिरवा.

उधळली सारी मनाची दौलत,
दुख वाटण्याची होती सवलत.
जीवापाड जपणारी माणसे,
माझ्यासारखी मिळोत सर्वा.

अशात एक होती सोबती,
चालली माझ्याच वाटेवरती.
इथवर दिला आधार मला,
कशाची करता पर्वा.

वैभवात मी नांदलो जरी,
पाय राहिलेत जमीनीवरी.
विसरलो ना दिन कालचे,
वाढू दिले कधीही गर्वा.

आज इथे हा दिन ढळताना,
आयुष्याचा शेवट कळताना.
आठवती ते सारे प्रियजन,
जो थे जिते वक्त मे गवाँ.

बिछड गये दोस्त सारे,
जी रहे हे यादो के सहारे.
सकाळी जे पडले स्वप्न,
वाटले कि भेटलो काल वा परवा.

त्या जगण्याच्या उत्साहाला,
सलाम देते हि हवा,
कहाँ मे अकेला लढा,
साथ था मेरे अपना जहाँ.

.................अमोल