Monday, November 21, 2011

बाबा रिटायर होतोय


आज  माझंच  मला  कळून  चुकलं,
मलाच  नातं   नीट  जपता  नाही  आलं.
आज  जेवून  झाल्यावर  बाबा  बोलला,
"मी  आता  रिटायर  होतोय,
मला  आता  नवीन  कपडे  नको,
जे  असेल  ते  मी  जेवीन,
जे  असेल  ते  मी  खाईन,
जसा  ठेवाल  तसा राहीन."
काहीतरी  कापताना  सुरीने  बोट  कापलं  जावं,
टचकन  पाणी  डोळ्यात  यावं,
काळीजच  तुटावं,
अगदी  तसं  झालं.
एवढाच  कळलं कि  आजवर  जे  जपलं ते  सारंच फसलं.

का  बाबाला  वाटलं  तो  ओझं  होईल  माझ्यावर ?
मला  त्रास  होईल  जर  तो  गेला  नाही  कामावर ?
तो  घरात  राहिला  म्हणून  कोणी  ऐतखाऊ  म्हणेल,
कि  त्याची  घरातली  किंमत  शून्य  बनेल.
आज  का  त्याने  दम  दिला  नाही,
काय  हवं ते  करा  माझी  तब्बेत  बरी  नाही,
मला  कामावर  जायला   जमणार  नाही."
खरंतर  हा  अधिकार  आहे  त्याचा  सांगण्याचा,
पण  तो  काकुळतीला  का  आला?
ह्या  विचारातच  माझं  खचलं.
नंतर  माझं  उत्तर  मला  मिळालं,
जसा  जसा  मी  मोठा  होत  गेलो ,
बाबाच्या  कवेत  मावेनासा  झालो,
नुसतं  माझं  शरीर  वाढत  नव्हतं,
त्याबरोबर वाढत  होता  तो  अहंकार,
आणि  त्याने  वाढत होता  तो विसंवाद,
आई  जवळची  वाटत  होती ,
पण  बाबाशी  दुरावा  साठत   होता.
मनाच्या  खोल  तळापर्यंत  प्रेमच  प्रेम होतं,
पण  ते  शब्दात  सांगताच  आलं  नाही,
बाबानेही  ते  दाखवलं  असेल,
पण  दिसण्यात  आलं नाही.
मला  लहानाचा  मोठा  करणारा  बाबा,
स्वताच  स्वतःला  लहान  समजत होता.
मला  ओरडणारा  शिकवणारा बाबा,
का  कुणास  ठाऊक  बोलताना  धजत  होता.
मनाने  कष्ट  करायला  तयार  असलेल्या  बाबाला,
शरीर  साथ  देत  नव्हतं,
हे  त्या  शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,
घरात  नुसतं बसू देत  नव्हतं.
हे  मी  नेमकं  ओळखलं.

खरंतर  मी  कामावर  जायला  लागल्यापासून,
सांगायचच  होतं  त्याला  कि  थकलायेस  आराम  कर,
पण  आपला  अधिकार  नव्हे  सूर्याला  सांगायचा  कि मावळ  आता.
लहानपणीचे  हट्ट  पुरवणारा  बाबा,
मधल्या  वयात  अभ्यासासाठी   ओरडणारा  बाबा,
आणि  नंतर  चांगलं  वागण्यासाठी  कानउघडणी  करणारा बाबा,
आजवर  सारं काही  देऊन  कसलीच  अपेक्षा    ठेवता,
जेव्हा  खुर्चीत  शांत  बसतो,
तेव्हा  वाटतं कि  काही  जणू  आभाळंच  खाली  झुकलं.
आज  माझंच  मला  कळून  चुकलं. 

................अमोल

Sunday, November 13, 2011

एक दुर्लक्षित सुंदरी

जे  डोळ्यांना  भावतं  ते  आणि  तेच  सुंदर  मानणारे  आपण  विसरून  जातो  कि  सुंदरता  त्यापलीकडेही  असते,
हि  कविता  तश्याच  एका  सुंदरीची  जिचं  सुंदरपण तिच्या  दिसण्यात  नव्हतं तर  कर्तबगारीत  होतं,
एका  मोठ्या  हुद्द्यावर  काम  करणारा  माणूस  जेव्हा  कोरा  चेहरा  घेऊन  जगतो  तेव्हा  आपण  त्याला  कामाचा  ताण म्हणतो,
किंवा  त्यालाच  कर्तबगार  म्हणतोजवाबदार  म्हणतोहि  कविता  तश्याच  प्रकारे  जगणाऱ्या  एका  स्त्रीची  मग  आपण  तिला  सुंदर  का  म्हणू  नये ?
विश्वास  ठेवा  लचकणारी  कंबर  सुंदर  असतेच  पण  त्याहून  सुंदर  असते  घराचा  भार सोसणारी  कंबरबाकी तुम्ही  हुशार  आहातच.
तिचं  कुणी  नव्हतं  आणि   तीही  नव्हती  कुणाची,
ती  एकलीच   जगायची  ती  शक्ती  होती  मौनाची.

ती  स्वतःत  विस्कटलेली  इतरांकडे  लक्ष  नसायचा  तिचा,
तिला  गरज  होती  तेव्हा  कोणी  हातही  नव्हता मदतीचा.

निरागसपणा  चेहऱ्यावर  नव्हता  एक  राठपणा   आलेला,
पाठीवर  आभाळ  पेलून  तिचा  ताठ  कणा झालेला.

ती  चेहरा  वैगरे  झाकत  नसे  उन्हाला घाबरून बिबरुन,
उन्हालाच  घाम  फुटायचा  तिच्या  जवळ   आल्यावर  दरदरून.

तीही  होती  कधी  अल्लड , नाजूक ,  अगदी  मऊशार,
परिस्थितीच  करते  असा  कापसालाही  पेटता  अंगार.

तिला  लपून  बघायचीही   फारफार  भीती   वाटते,
आग  किती  भयाण  असते  हे  तिला  पाहिल्यावर  पटते.

ती  हसतच  नाही  कुणाशी  अगदी  रुक्ष  वाटते,
गर्दीत  उभी  असताना  अंधारातला वटवृक्ष  वाटते.

स्वतःला  जपताच  नाही  आलं  तिला  इतरांना जपता जपता,
घर  सुखात  ठेवण्यासाठी  तिचा  आनंदच हरवला  होता.

ती  जगत  होती  तिच्या  मागे  घेऊन  तिची  निंदा,
दोन  लहानग्या  पोटासकट अख्ख्या  घराची  पोशिंदा.

सुनं कपाळ , मोकळा  गळा ,  साधी  सलवार ,  हातात  रुमाल,
ती  रेखून  करत  होती  विस्कटलेल्या  आयुष्याची  वाटचाल.

तसं  सारंकाही  होतं  तिच्याजवळ   जे  लागतं   जगण्यासाठी,
नव्हती  ती  केवळ  तिला  आपलं  म्हणणारी  नाती.

मनाला  घालून  मर्यादा , बांधून  चौकट   ती  जगत  होती  कलंदर
सगळे  म्हणतात  तिला  राबस  पण मला दिसते  ती  सुंदर.


................अमोल

Friday, November 4, 2011

ऋतू आला थंडीचा साजिरा सोवळा
ऋतू  आला  थंडीचा  साजिरा  सोवळा,
घन  बरसून  छान   सरला  पावसाळा.

हि  अवनी  कशी  दिसते  हिरवाईने  सजून,
येते  ऊनही  कसे  सजणीसम  लाजून,
नाही  घामाच्या  धारा,  ना  तीष्ण  उन्हाचा  झळा.

बीज  नात्यांचे  मोहरे  फुले  टपोरासा  दाणा,
सण  दसर्या  दिवळीने  झाला  आनंदही मना,
निराशेच्या  आसमंती  सजे  दिपांचा  सोहळा.

पहाटेच्या  थंडीत  लागे  गारठ्याची झळ,
अंगावर  असते   आईची  मऊ गोधडी  मखमल,
विरक्तीच्या  गावा  लागे  सोबतीचा  लळा.

येता  शहारून  अंग कुणी  असते  बिलगण्याला,
त्या  उबदार  मायेने  येते  नाविन्य  जगण्याला,
त्यात  अंगावरून  जातो  स्पर्श  मलमलता  कोवळा.

दाट  धुक्यात  जेव्हा  चाले  अनोळखी  वाट,
आणि  संगे  असतो  एक  आपुलकीचा  हात,
वाजवितो  पावा  त्यात  कृष्ण  मदन  सावळा.

.....अमोल