Sunday, August 28, 2011

नववधू स्वागत गीत


का  लाजतेस   साजणी  नुसतेच हासतेस साजणी,
हे  घर  तुझे,  मी  हि  तुझा,  तू  साऱ्याची   स्वामिनी,
का  बावरते  अशी, कोणी  ना परके  तुला या  क्षणी.

अग्नीब्राम्हण   साक्षी ठेउनी, पूर्वजांचा   मान  राखुनी,
थोरांचा   आशीर्वाद   घेउनी हे  जुळले नाते घे  जाणुनी,
सुवर्णअक्षतांत न्हाउनी, वेद मंत्रांच्या पठनातुनी,
एकरूप  झाली हि  दोन  शरीरे  कुलदैवतेस  स्थापुनी,
सनई  चौघड्यांच्या  तालास्वरात  सुहासिनीनी  ओवाळूनी ,
तू  आलीस  या  घरात    मंगल  कलश  ओलांडूनी,
तरी  मग   का  लाजतेस   साजणी  नुसतेच हासतेस साजणी.

या  अबोल ओठंना  सांग  बोलायला   काहीतरी,
या शालीन  नजरेला  सांग  निरखायला  काहीतरी,
किती   वेळ   अंगठ्याने   रेखाटशील  नक्षी,
आता  तरी  उडू  देत  तो  लाजेचा  पक्षी,
न्याहाळ  हे   घर  नवे  ज्याचे   मंदिर  तुला  करायचे,
आणि  रंग  भरायचे  काढून  रांगोळी  अंगणी,
का  लाजतेस   साजणी  नुसतेच  हासतेस साजणी.

















होते   सुखाची  छनछन,वाजता  तुझा  पैंजण.
नको  मानुस  याला  बंधन, माझे आकाश  दिले  तुला  आंदण.
हि गाठ  असे  पवित्र, जिचे  नाव  मंगळसूत्र.
हि  माळ  ना  धाग्याची, हि  माळ  सौभाग्याची.
हा  ना तुझा  दागिना, असे  माझ्या  अस्तित्वाच्या खुणा.
हे  ना  नुसते  मनी, हि  सात  जन्माची बांधणी.
का  लाजतेस   साजणी  नुसतेच  हासतेस साजणी.

तू   कामना,   स्वच्छ   वासना,  श्वासांतील  रागिणी,
तू  कामिनी,   तू  मोहिनी,  तू  शुद्ध  वैरागिनी,
चित्ताचे   रूप   तूआत्म्याचे   स्वरूप   तू,   तू  रुपाची  यौवनी,
तूच  अर्थतुच  स्वार्थमाझा  सर्वार्थ  हि  तुझ्यातुनी
तुझ्याच   ओटीत  मी  अर्पितो हे  घर   प्रिय  प्राणाहूनी,
मीच  माझा    राहिलो  सर्वस्व  तुला  अर्पुनी.
का  लाजतेस   साजणी  नुसतेच  हासतेस  साजणी.

...अमोल

Sunday, August 21, 2011

आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो


आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो,
अळवावरल्या  पाण्याच्या थेंबासारखं असतं आमचं,
क्षणभराचं सुखं, क्षणभराचं दुखंसुद्धा,
तरी सुद्धा खोल खोल भावनेची ओल असते मनात,
आमचं हसणं, रुसणं सारं काही असतं क्षणाचं,
कारण विचारांपेक्षा आम्ही ऐकतो आमच्या हळव्या मनाचं.
क्षणात होतो इंद्रधनू, क्षणात काळोखी रात्र होतो.
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

स्वप्नांना जपतो आम्ही, स्वप्नांना जगतो आम्ही,
तुम्हाला उगीच वाटतं वेड्यासारखं वागतो आम्ही.
स्वप्नांसारखं मधीच भंग पावतो कधी,
स्वप्नांसारखंच नव्याने पुन्हा जन्म घेतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

अधल्या मधल्या गोष्टींशी आमचं जुळतच नाही,
टोकाच्या भूमिकेशिवाय आम्हाला काही कळतंच नाही,
एकदा विश्वास बसला कि काही केल्या उठत नाही,
आणि एकदा विश्वास उठला कि काही केल्या बसत नाही.
प्रेम हि आमचं जिवापार आणि रागही अगदी तीव्र असतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

आयुष्यातली प्रत्येक संवेदना आम्हाला स्पर्शून जाते,
निरर्थक गोष्टही आमचा फार वेळ खर्चून जाते,
हव्या त्या गोष्टीत विनाकारण दुर्लक्ष होतो,
पण भोळंभाबडं मन वेगळीकडेच एकलक्ष होतो,
यशअपयशाच्या शर्यतीत आम्ही नेहमी शेवट गाठतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

छत्री असून सुद्धा आम्ही भिजत जातो,
चपला घेऊन हातात चिखलात उगी चालत राहतो,
पाऊस बोलतो आमच्याशी, वारासुद्धा बोलतो,
माती बोलते आमच्याशी, आभाळही मन खोलतं,
जमिनीवरलं हिरवं गवत जणू आमच्यासाठीच डोलतं.
पावसाचा गंध मित्रासारखा आणि ती सर भासते मैत्रीण,
आणि वाटते त्या कडकडनाऱ्या विजेशीही आहे जुनी वीण,
अश्या कईक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत रहातो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.



आम्हाला तुमच्याकडून हवी असते थोडी माया,
अगदी खर्रखुर्र प्रेम आणि आपुलकीची छाया,
आमचं काळीज तळहातावरती घेऊन फिरतो आम्ही ,
पण तिळाएवढाही खोटेपणा सहन करता येत नाही,
भावनांवर नसतो ताबा आणि आसवांशी पक्क नातं असतं,
दुरावा नको असतो म्हणून मन मनाची जवळीक जपत बसतं.
जरी आम्हाला तुमची गरज तरी सांभाळून घ्या ही विनंती करतो.
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो



कधी कधी आम्ही तुमचा राग करतो पण लक्षात ठेवत नाही,
हळवेपणाच्या कक्षेत फार काळ काही टिकतच नाही,
तुम्ही घेता राग साहजिकच तुमच्या मनावर,
पण भावनेच्या भरात आम्हीच नसतो भानावर,
वेळ गेल्यानंतर आमचा व्रण मग चिघळत  जातो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो,
अगदी काचेच्या वस्तुसारखी नाजूक,
तुम्हीच जपायचं असतं आम्हाला जिवापार,
नाहीतर आम्ही स्वतः तरी जखमी होतो,
नाहीतर तुम्हाला तरी जखमी करतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

.......अमोल



Friday, August 12, 2011

नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी

नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी,
अन जागते मनात मिलनाची आसही.
विसरुनी देहभान निघे प्रितबावरी,
नवीन वाट चालण्याची अन नवा प्रवासही.

यमुनेचा तट ओला राधेच्या नयनांपरी,
कान्हास का तरी सुचे अशी खुशमस्करी.
वाजवी लपुनी  बासरी  येई ना सामोरी का?
थकली राधा बिचारी मारुनी त्याला हाका.
प्राण कंठागत आले श्वासही मंदावला,
होईना सहन विरहाची कळ अंतरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.

हताश झाली राधिका फिरताना माघारी,
जड झाली पावले जाववेना रिते घरी.
मग येई कान्हा देई तिला मागून मिठी,
तरंग उठती मनात सुखावते तनु तिची.
अबोल होते क्षणात बोले ना शब्द ती,
गालात गोड रुसवा ओठात कोर हासरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.
स्वरपंक्ती कान्हाच्या साठवे मनोमनी,
हरपुनी देहभान पाहे त्याच्या लोचनी.
रंग चढे रातीला चांदणे येई खुलुनी,
पौर्णिमेचा चंद्रही त्यांसवे ये फुलुनी.
तल्लीनता पावली सजताना रास अशी,
आत्म्यांसवे होतसे पवित्र प्रित साजरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.


......अमोल