मी हि आस्तिक होतो,
माझीही नितांत श्रद्धा होती.
मी चूक केली अपेक्षेची,
नशिबात उपेक्षेचीच रेष बहुधा होती.
मला न जे भेटले काही,
सांगण्यात आले की हा संचिताचा भाग आहे.
तू दिलेच काय देवाला ? याचा हिशेब सांग,
इथे श्रद्धा हि महाग आहे.
ते म्हणतात पाप पुण्याचं गणित होतं,
जगण्या साठी श्वास सुद्धा मोजून मिळतो.
सगळं काही ठरलेलं असतं आधीच,
आणि मृत्यू देखील वेळ योजून येतो.
मी कर्मयोगाचा भक्त आहे,
प्रयत्नवादातच मी देव मानतो.
इथे मिळकतीला संचित म्हणतात,
आणि जो तो अप्राप्तालाच दैव म्हणतो.
हरेक हतबल आहे नियतीसमोर,
तिचं सोडा हो! ती फार गहन नि विशाल आहे.
इथे स्वताशी तरी कोण लढतय,
शरणागती पत्करतोय खुशाल आहे.
छान पांघरून घालून ठेवलंय देवाला,
अज्ञानाच, आंधळेपणाच नि आळसाच.
गाभार्यात जायचीही तसदी नको असते,
म्हणून धन्य होतात दर्शन घेऊन कळसाच.
मला वाटत नाही हे खरं असेल,
कि देव नास्तीकांवर रागावलाय.
एकमेकांना दोष न देण्याचा तोंडी करार झालाय आमचा,
लेखीही करायचाय, पेपर मागवलाय.
ऐकलय कि देव हि कंटाळलाय या थोतांडाला,
त्याला हि चीड येते खोटेपणाची.
पण तरीही उभा आहे कमरेवर हात ठेऊन,
वाट बघतो आहे आणि एका तुकारामाची.
................अमोल