Friday, July 29, 2011

आईच्या काळजाची प्रतिमा

नका  काही  तोडू  माझ्या  जुन्या  घरातलं,
आणि  ते  स्वयंपाकघरही   अगदी  तसंच  राहू  द्या.
तिथे  एक  चूल  आहे  जळणारी,
माझ्या  आईच्या  काळजाची  प्रतिमा.

हवं तर  देवघरही  तोडा,
माझी  त्यालाही  नाराजगी  नाही.
पण  स्वयंपाकघर  नका तोडू ,
माझा  देव  तिथेच  नांदतो.

आज  जरी  तिथे  चूल  जळत  नाही,
पण  राख  आहे  ना  तशीच,
मला  तिची  स्वप्न  नाही  जपता  आलीत,
ती  राख  तरी  तेवढी  राहू  द्या.

तशी  ती  साऱ्याच  घराची  मालकीण,
पण  स्वयंपाकघर   तिचं  खास,
मलातर  तिच्याच  पदराचा  निवारा  होता,
बाकीचं  घर  उगाचच  ताव  मारायचं.

आणि  राहू  द्या  ते  तुळशीचे  रोप,
लोकांकडे  लक्ष्मी  सांजवेळी  येते,
माझी  लक्ष्मी  सकाळीच  तुळस  पूजा  करून,
पहिले  मलाच  दर्शन  द्यायची.


तो  आतल्या  खोलीतला  काचेचा  तुकडा,
आणि  तो  तुटलेला  कंगवाही   राहू  द्या.
आणि  राहू  द्या  तो  कुंकुवाचा  करंडा,
त्याचा  धनी  येणार  आहे  असं  म्हणायची  ती.

तो  उंबरठा  सुद्धा  राहू  द्या,
आणि  राहू  द्या  ती  रांगोळी  सुद्धा,
पुसू  नका  ती  “श्री  रामअक्षरे,
या  शबरीच्या  मागे  मी  वाट  पाहीन तिच्या  रामाची.


हो  पण  मला  आणून  द्या  ती दोरीवरची  गोधडी,
आणि  ते  तिथलंच  तिचं  पातळही  द्या.
फार  माया  , फार  उब  देखील  आहे  त्यात,
आणि  हिमालय  अंगावर  घेण्याची  ताकद  सुद्धा.

आणि  काय  शोधतायतिच्या  चपला,
त्या  नव्हत्या  कधीच  तिच्याकडे.
अनवाणीच  तुडवायची  वाट  ती  सदा,
आता  तर  दगडंही  मऊ वाटायची  त्या  तळव्यांसमोर.

नाही  शोभलं तरी  राहू  द्या,
माझ्या  नवीन  घरामागे  हे  तिचं  घर.
या  पेक्षा  तिची  चांगली  समाधी बांधायला,
मला  नाहीच  जमणार  कधी.

...अमोल