Thursday, September 2, 2010

“आई”स्क्रीम

काल मला यायला फारच उशीर झाला.
विरघळलेला आईस्क्रीम तुला एकटीलाच खावा लागला.
आयुष्यातही बरेचसे आनंद तुला विरघळल्यानंतरच भेटलेत.

दिसभर राबणाऱ्या तुझ्या हातांना मी बघतो.
तुझ्या चेहऱ्यावरच्या विरलेल्या आनंदालाही मी बघतो.
सकाळी उठल्यानंतर आसवानी भिजलेल्या उशीलाही बघतोच मी.

तुझ्याही मनात ईच्छा आकांक्षा होत्याच असतील.
मला वाटत मीच साखळी झालो असेन तुझ्या पायाची.
अमावसेला चंद्र आकाशातच असतो, न उगवण्याच वचन आहे म्हणे त्याच.

तुझ्या एकटेपणात तुझ्याशी बोलणारे कुणीच नव्हते.
पण जागोजागी तुला बोलणारे अनेकजण होते.
तुझी चूकच मला अजून कळली नाहीयेय.

माझ्या प्रत्येक जखमेवर तूच औषध आहेस.
पण तुझ्या सर्व जखमा मला कधीच दिसल्या नाहीत.
एका नजरेत पूर्ण सागर बघणे कठीण आहे.

आज तू किती निछींत झोपलीयेस एका अर्भकासारखी.
या आधी झोपतानाही उठण्याची चिंता असायची.
मरणात इतकी शांती असते हे माहित असत तर पहिले थांबवलंच नसत.

तू फार धन्य आहेस, तरी पुढल्या जन्मी तुझ्या पोटी मी नाही येणार.
उगाच कशाला त्या गर्भातल्या, प्रसुतीच्या आणि त्यापेक्षाही वाढविण्याच्या कळा.
त्यापेक्षा तूच माझी घरी जन्म घे, बरीच सेवा राहिलीय अजून.

......अमोल राणे

No comments:

Post a Comment