Wednesday, November 3, 2010

मी मोठा झालो...

आपण वयाने, बुद्धीने जेव्हा मोठे होतो तेव्हा नकळत अहंकार मोठा होत असतोच आणि त्याची पाऊले कधीतरी घरातल्या भांडणात जाणवतातच. आपण जेव्हा त्रयस्तपणे या गोष्टीकडे बघतो तेव्हा आपली चूक आपल्याला कळते, पण फार थोड्या लोकांकडेच असे स्वतःला न्याहाळण्याची कला अवगत असते अश्याच एका मनाची आणि स्वताला सुधारण्यासाठी चालू असलेल्या धडपडीची कविता.

मी मोठा झालो याची मला जाण आली.
"मी"पणाची माझ्या आज वर मान झाली.

मी आता समर्थ झालो स्वतःला पोसायला,
गरज नाही कुणाची व्यथा माझी सोसायला.
वाढत्या गर्वापुढे नीतीची तलवार म्यान झाली.

आवडी बदलल्या माझ्या, निर्णय माझे मीच घेतो,
पडलो तरी रडणार नाही याची स्वताला हमी देतो.
बेपर्वाईच्या पावसात काया झाली गुमान ओली.

उडू लागलो मुक्त आकाशी पंख फुटल्यामुळे,
गुरुर मजला श्वाशात बंध सुटल्यामुळे.
अहंकारातच बुद्धीही दिनरात रममान झाली.

आजपर्यंत वाढलो ज्यांचे धरून बोट मी,
विसरून त्यांना भरतो स्वतःचे पोट मी.
माझ्यावरल्या संस्कारांची सावलीच बेईमान झाली.

.....अमोल

No comments:

Post a Comment