हरणे म्हणजे सरणे नाही,
बरंच काही असतं बाकी.
एखाद्याच अपयशाने,
व्हायचं नाही एकाकी.
जिंकणारा असतो एकटाच,
हरणाऱ्या सोबत सोबती.
सूर्य नाही बनता आले,
तरी चंद्र म्हणून उजळावे राती.
जरा घेतला विसावा,
म्हणजे काही दमलो नाही.
आयुष्य अखंड सराव आहे,
म्हणून विजयात रमलो नाही.
हरणेच देते पुन्हा संधी,
बरेच काही सुधारण्यासाठी.
नव्याने लढून लढाई,
विजयाची गुढी उभारण्यासाठी.
तिथेही पुन्हा हरलास तरी,
हिरमुसून जाऊ नकोस.
जिंकणाऱ्याला शुभेच्छा दे,
तिथेही मागे राहू नकोस.
जगताना जगावे असे कि,
मेल्यानंतरही रहावे काही.
आयुष्य हे सुंदर आहे,
त्याचा शेवट हे मरणे नाही.
.....अमोल
No comments:
Post a Comment