Thursday, December 16, 2010

बिझी बाबा

बालपणीच्या व्यथा:

तुला कधी भेटलाच नाही का रे  वेळ माझ्यासाठी,
आणत राहिलास फक्त नवे नवे खेळ माझ्यासाठी.

आईच्याच पदराची सदा होती माया माझ्यावरी,
तू दिसभर खंगून जमवत होतास मरगळ माझ्यासाठी.

बघ आठवतं का कधी घेतलस मला खांद्यावरी,
घरी आलास का संध्याकाळी कधी सरळ माझ्यासाठी.

पुरवत होतास सारं काही चुकता बेहीशेबही,
मिरवाव खांद्यावरून कधी वाटली का तळमळ माझ्यासाठी.

मी बसून असायचो लाऊन आस, सांजेला दाराकडे,
पण नीट बघायलाही नसायचं तुझ्याकडे बळ माझ्यासाठी.

जाणीवेच्या उंबरठ्यावर:

आता मला सवय झालीय तुझी असूनसुद्धा नसण्याची,
पण टोचते मनात तू भोगलेली हर कळ माझ्यासाठी.

मी फिरतो आता वाटेवरी फुलांच्या मखमालींच्या,
सावलीत ठेऊन मला, सोसलीस उन्हाची झळ माझ्यासाठी.

 निर्वाणीच्या वेळी :

तुझ्याशी खूप बोलायचंय, तुझही खूप ऐकून घ्यायचय,
निदान भांडण्यासाठी तरी काढना एक संध्याकाळ माझ्यासाठी

मला आता पंख फुटलेत, तुझी शरीरही शांत झालंय,
मोकळ्या आभाळात जाणवते तू सहन केलेली होरपळ माझ्यासाठी.

.......अमोल

No comments:

Post a Comment