Saturday, January 15, 2011

हळवीशी व्याकुळता

नात्याविरहित  आपुलकीचा,
हात जेव्हा झाला मिळता.
सहजच आली ओठांवरी,
हळवीशी व्याकुळता.

लाटेचे कधी नव्हते भय,
पण हरवण्याचे होते वय.
मोह झाला चांदण्यांचा,
नि पडली खुळी चांदणसय.
किनारयावरच तोल गेला,
विश्वासच अबोल झाला.
ऐन पहाटेच्या दाराशी,
मोगरयाचा मोल गेला.
परी बोलले कुणाशीही,
ना कुणा सांगितली व्यथा.

केव्हापासून चालते आहे,
मौन वेडे पाळते आहे.
प्रश्नार्थक चेहऱ्यांची.
नजर सदा टाळते आहे.
ज्ञानेश्वरी वाचणारे,
म्हणती मज हिज अध्याय.
एक हाती वाजे टाळी,
हाच एक मानती न्याय.
विश्वासात आंधळीची,
कशी सांगू मी कथा.

सुगंधाचा उत्सव आला,
तरी फुलले ना मी कळी.
भय स्वप्नातही दाटते,
फुलण्या पाकळी पाकळी.
हा हि ऋतू वाया गेला,
नि पुढचेही जातील वाया ऋतू.
आशा मनी कोणती,
आहे केवळ एक हेतू.
खुडावी ना कळी कोणती,
फुल तिचे होता होता.


......अमोल

No comments:

Post a Comment