Monday, August 1, 2011

जगण्यापुढचं प्रश्नचिन्ह ??????

माझ्या या आयुष्यावर काढा काही तरी उपाय,
अहो आयुष्य जगण्याचा मार्ग तरी काय.

कुणी म्हणे जग मिथ्या कुणी म्हणे सत्य,
कुणी म्हणे माया कुणी सर्वस्व म्हणतं.
कुणी म्हणे भोगावी वासना सारी,
कुणी म्हणे त्यागाचीच दुनिया न्यारी.
कुणी म्हणे विचारांची धरावी कास,
कुणी म्हणे पैश्यांचीच करावी रास.
एकटा मी कसे ठेऊ दोन दगडांवर पाय.

अहिंसेत पुण्य आणि हिंसेत पाप,
तरी इथे लढणाऱ्याला म्हणती बाप.
नम्रतेने वागायचं आणि जरी बोलायचं खरं,
मुजोर खोटारड्यांचीच इथे मोठ्ठाली घरं.
रहावे कसेही परी असावा अंगी गुणं,
अहो सांगा हे सूत्र झालंय का आत्ता जुनं.
ताकदीच्या पुढे बुद्धीचे चालेचना हातपाय.

सारे देशवासीय असले बांधव जरी,
प्रांतवादाची इथे फार मोठो दरी.
सरकार सांगे नका मानू धर्म जात,
तरी जातीची जागा सरकारी रकान्यात.
भ्रष्टाचार थांबवा सांगे हर नेत्याचा घसा,
तरी करायला कामे त्यांचाच भरा खिसा.
इवल्याश्या मेंदूला कळेना कोणताच पर्याय.

निष्ठेने वागण्याचे जरी संस्कार झाले,
आणि सांगती आता घोर कलियुग आले.
असत्याचे पारडे होत नाही जरी जड,
पण सत्याचा मार्ग असे अवघड.
स्वैराचाराने वागणाऱ्याला मिळे बरा मान,
निराशाच पदरी पडे इथे वागून नियमानं.
मूल्यशिक्षणाचं पान काय जीवनातूनच फाडतायं.

जगावं स्वतःपुरतं कि इतरांसाठी जगावं,
सोसावं अपार जीवनी कि स्वार्थी बनावं
विसरून जावीत का सारी ऋणं,
कि जपत बसावी साऱ्यांची मनं.
वाढू द्यावा मत्सर वाढू द्यावा वाद,
कि व्हावे एकसंघ विसरून मतभेद.
दुधासारख्या आयुष्यावर शोभे ना अवगुणाची साय.

आस्तिकतेची धरून माळ जपावी का श्रद्धा,
कि नास्तिकतेच्या मशालीने शोधावा स्वतःत खुदा.
विज्ञानाची कास धरू कि जुनं ते सोनं म्हणू,
माणुसकीला  ओळखू पहिले कि दगडात देव मानू.
शिक्षणाच्या वापराने स्वतःपुरतं जगू,
कि मानवतेच्या कल्याणचं रणशिंग फुकू.या गोंधळलेल्या अवस्थेतून कधी बाहेर काढतायं.

..........अमोल.

No comments:

Post a Comment