विज्ञानरुपी विठ्ठल उभा तंत्रज्ञानाच्या विटेवर,
आणि प्रगतीचे दोन्ही हात घेउनिया कटेवर.
माहितीरूपी कुंडले श्रवणी तळपती,
संशोधनरुपी माळा गळ्यामध्ये रुळती.
नाविन्याचे पितांबर नेसुनिया साजिरे,
प्रबोधनरुपी चंदन लाउनिया अंगभर,
विज्ञानरुपी विठ्ठल उभा तंत्रज्ञानाच्या विटेवर.
असाध्य अश्या रोगांना देऊनिया शिक्षा,
सुखकर करतो मानवी जीवनाच्या परीक्षा.
वांझोट्या मातृत्वालाही देई संतानाची प्राप्ती,
यश गवसे हमखास अशी याची महती.
नवनवीन शोधांनी उडवी अज्ञानाची दाणादाण,
सफल करी आयुष्य वापरून बुद्धीचे वरदान.
नव्या औषध इलाजांनी ना मृत्यूचेही डर,
विज्ञानरुपी विठ्ठल उभा तंत्रज्ञानाच्या विटेवर.
संवादाचे नवे साधन शोधून काढला दूरध्वनी,
कितीही असो दूर कुणी, संपर्क होई हवा त्या क्षणी,
आकाशात उडण्यासाठी दिले पंखाचे विमान,
मिसाईलरुपी अस्त्र दिले शत्रूवर साधण्या संधान.
इंटरनेट काय 3G काय सारी किमया त्याची,
विवेकाने वापरून विज्ञान करण्या सेवा मानवतेची,
याच भगवंताने घडविली परग्रहावरही सफर,
विज्ञानरुपी विठ्ठल माझा उभा तंत्रज्ञानाच्या विटेवर
.....अमोल
No comments:
Post a Comment