नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी,
अन जागते मनात मिलनाची आसही.
विसरुनी देहभान निघे प्रितबावरी,
नवीन वाट चालण्याची अन नवा प्रवासही.
यमुनेचा तट ओला राधेच्या नयनांपरी,
कान्हास का तरी सुचे अशी खुशमस्करी.
वाजवी लपुनी बासरी येई ना सामोरी का?
थकली राधा बिचारी मारुनी त्याला हाका.
प्राण कंठागत आले श्वासही मंदावला,
होईना सहन विरहाची कळ अंतरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.
हताश झाली राधिका फिरताना माघारी,
जड झाली पावले जाववेना रिते घरी.
मग येई कान्हा देई तिला मागून मिठी,
तरंग उठती मनात सुखावते तनु तिची.
अबोल होते क्षणात बोले ना शब्द ती,
गालात गोड रुसवा ओठात कोर हासरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.
स्वरपंक्ती कान्हाच्या साठवे मनोमनी,
हरपुनी देहभान पाहे त्याच्या लोचनी.
रंग चढे रातीला चांदणे येई खुलुनी,
पौर्णिमेचा चंद्रही त्यांसवे ये फुलुनी.
तल्लीनता पावली सजताना रास अशी,
आत्म्यांसवे होतसे पवित्र प्रित साजरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.
......अमोल
No comments:
Post a Comment