ज्यांना मुलं होत नाही अश्या स्त्रियांना समाज वांझ म्हणतो,पण असा शिविवाचक शब्द पुरुषांसाठी नाही कारण समाज कधी यासाठी पुरुषाला दोषी धरतच नाही,आणि शब्द दिला असेल तर तो निपुत्रिक असा सोज्वळ शब्द दिला आहे.
आता जी कविता सादर करीत आहे ती एक पुरुष म्हणून करणे काहींना योग्य वाटणार नाही, पण जरा भाऊ, बाप , मुलीचा मामा, मुलीचा काका या दृष्टीकोनातुना बघितले तर पुरुषपण गळून जाईल, आणि प्रश्न उरेल कि खरच "ती"च जवाबदार असते का या सगळ्याला.
शाप मेहंदीचा.
कुण्या हातावर रंगते मेहंदी,
कुण्या हातावर मेहंदी रंगतच नाही.
सारा दोष सारे देती मेहंदीलाच,
हाताला कुणी दोषी धरतच नाही.
धर्म सदा रंगण्याचा असे मेहंदीचा,
हातातल्या उर्जेने चढे रंग मेहंदीचा,
पानापानाला कुटून बने लेप मेहंदीचा,
चढे ना रंग हा काय गुन्हा केवळ मेहंदीचा ?
सारा भोग सारा त्रास मेहंदीच्या नशिबाला,
असे किती सोसले मेहंदीने हे नसे हिशोबाला.
काल परवाही कुण्या हातांनी झाड तोडून टाकले,
म्हणे असेच भोग ना रंगणाऱ्या मेहंदीने भोगायला हवे,
ज्या हातांमध्ये कुवत नसेल मेहंदी रंगवून घेण्याची,
मग सांगा का नको ते हातही तोडायला हवे ?
मेहंदी निमूट सोसते म्हणून भोगते हा भोग,
किती वर्षे झाली नाही बारा हा समाजातला रोग.
_____________________________________________________________________
No comments:
Post a Comment