Saturday, November 30, 2013

मी तुझा विटाळ साधा.

नाळ तोडलीस तरी,
जिवंत बेंबी अजून.
मी तुझ्यातून जन्मल्याची,
ती एक नंगी खून.


वाऱ्यासही ना जमले,
तू तिथे स्पर्शू दिले.
ओठांनी जे चाखिले,
ती तुझे दुध पहिले.


रक्त आटवून लाल,
घट भरती शुभ्रपणाचे.
अमृत भेटे ज्यालात्याला,
ज्याच्यात्याच्या अधिकाराचे.


पहिले पाजलेस दुध,
मग भरविलेस हातांनी.
मी मोठा होताच आज,
मोकळी दूर लोटुनी.


आज ओठांस लुचण्याचा,
नाही विचार वेडा.
तू आई मी बाळ,
तरी उभ्या कठोर मर्यादा.


मी द्वंद अवस्थेत उभा,
व्यभिचाराच्या बाजारात.
कुण्या कामाक्षीचा उर स्पर्शता,
थेंब दुधाचा कल्लोळे रक्तात.


तुझी आठवण येता,
गळते पुरुषीपण घाणेरडे.
तू ती अनुसूया जिथे,
लोळती त्रीमुर्तीही नागडे.


स्मरण तुझ्या दुधाचे,
असे मिटणार नाही.
तू तोडलीस नाळ तरी,
बेंबी बुझाणार नाही.


तू ती पवित्रता जिने,
बांधले पदरात वेदा.
मी शापित अपवित्र,
तुझा विटाळ साधा.

..........अमोल

No comments:

Post a Comment