Showing posts with label प्रेरणादायी. Show all posts
Showing posts with label प्रेरणादायी. Show all posts

Sunday, August 25, 2013

असे जगावे आयुष्य कि,
आयुष्याची मजा यावी .
आयुष्यातून कंटाळ्याने,
आयुष्यभराची रजा घ्यावी .

आजंच  आता जगू,
उद्याचं काय ते उद्या बघु.
चिंता जावी अशी काही विसरून,
जसे फुल नकळत गळावे देठापासुन.
हि अवस्था मनाची  इतक्या सहजा व्हावी.













मनात उल्हासाचे इंद्रधनू,
पसरत राहावे क्षणोक्षणी.
आपला उत्साह पाहून,
आनंद व्हावा फुलाच्या मनी.
चैतन्याच्या बेरजेतून उदासीनता वजा व्हावी.

अमोल 

Monday, June 20, 2011

आता चिडायचं नाही

आता चिडायचं नाही, ओरडायचं नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

आता कविता लिहायची स्वतःसाठीच,इतरांसाठी नाहीच मुळी
वाहवा स्वतःच द्यायची जरी वाटली कल्पना खुळी,
पण आवडणार नाही कुणाला म्हणून पान फाडायच नाही.

वाचता येईल तितक खोल उतरून वाचायचं मन समोरच्याच,
पण त्रयस्तपणे.
पान वाचताना आवडलं म्हणून दुमडायच नाही,
कि आवडलं नाही म्हणून वाचताच परतायचं नाही.
आणि कितीही असह्य झालं तरी स्वतःच पुस्तक इतरांसमोर उघडायच नाही.

चालताना वाटेमध्ये जुने जुने ओळखीचे भेटतील,
आठवणींचे ढिगारे खूपच खोल खणले तरी हरकत नाही,
पण एकाही खड्ड्यात आता बुडायचं नाही,
चालत राहायचं दूर दूर, नाही जमलं तर बसायचं वाटेतल्या दगडावरती,
पण किती वाटला दगड मोहक तरी आपला नाव त्यावर कोरायच नाही.

खोल खोल दऱ्या भेटतील मार उड्या,
उंच उंच डोंगरावरही चढायला घाबरू नकोस,
पण सावरायला नसेल कोणी म्हणून सांभाळून जा, पडायचं नाही,
आणि पडलास तरी हसायचं, रडायचं नाही.

आता झरलेले क्षण पुन्हा येतील पुढ्यात बसायला,
झालेल्या चुकांचे दोष शोधत राहायचं नाही,
येईल ते भोगायचं पण त्यांच्याशी भांडायचं नाही,
त्यातना शिकता येईल तेवढं शिकायचं, घडायचं, त्यांच्यावर बिघडायच नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

.....अमोल

Thursday, May 19, 2011

सार्थ-व्यर्थ

कधी सार्थ वाटे मनाचे इशारे,
कधी वाटते आहे व्यर्थ हे सारे.

इच्छा झुरावी,स्वप्ने चुरावी,
अशी दुखे कुणाच्या का वाट्यास यावी?.
फुलांनी फुलुनी  दरवळावा गंध,
वेलीनी त्यांस  अलवार  हातात द्यावी.
जपावी ती सारी, द्यावा हळुवार स्पर्श,
पण नाजूक ती  अंगे  नये  कुस्करावी.
आनंदाचा ऋतू घेउनी उमलती फुले सारी,
गांधाविना वाटती शून्य वारे.

कधी दाटतो मेघ डोळ्यातुनी,
कंप पावे सुरांची रेघ आतुनी आतुनी,
जीव आतुर होतो, आस वेडावते.
सहन होत नाही, सर आसवांची वहाते.
कळ उठता उरात, कसे मग हसावे?,
चिंता ना करावी,कसे निवांत बसावे?.
आसुसलेल्या आकांक्षा जाती  विरघळूनी जेव्हा ,
नको वाटती तेव्हा जीवनाचे पसारे

कधी स्पर्श मोहाचा मोहरवूनी जातो,
आणि हर्ष प्रेमाचा मना हरवूनी गातो,
कधी टोचती काटे वाटेतील  उगाच,
कधी बोचतो  डंख मिठीतील वेगळाच.
बंद डोळ्यांना तेव्हा खरी जाग येते,
गाठ विश्वासाची जेव्हा सुटुनी पहाते.
जर का सावलीस श्राप असतो उन्हाचा,
कश्यास मग सजवू  जीवन  नश्वर असणारे.


.....अमोल

Tuesday, October 12, 2010

हरणे म्हणजे सरणे नाही

हरणे म्हणजे सरणे नाही,
बरंच काही असतं बाकी.
एखाद्याच अपयशाने,
व्हायचं नाही एकाकी.

जिंकणारा  असतो एकटाच,
हरणाऱ्या सोबत सोबती.
सूर्य नाही बनता आले,
तरी चंद्र म्हणून उजळावे राती.

जरा घेतला विसावा,
म्हणजे काही दमलो नाही.
आयुष्य अखंड सराव आहे,
म्हणून विजयात रमलो नाही.

हरणेच देते पुन्हा संधी,
बरेच काही सुधारण्यासाठी.
नव्याने लढून लढाई,
विजयाची गुढी उभारण्यासाठी.

तिथेही पुन्हा हरलास तरी,
हिरमुसून जाऊ नकोस.
जिंकणाऱ्याला शुभेच्छा दे,
तिथेही मागे राहू नकोस.

जगताना जगावे असे कि,
मेल्यानंतरही रहावे काही.
आयुष्य हे सुंदर आहे,
त्याचा शेवट हे मरणे नाही.

.....अमोल

Thursday, September 2, 2010

तरुणाई

हेच ते वय असतं,
जिथे कुणाचं भय नसतं.
मोकळी असते स्वप्नातली वाट,
आणि कल्पनाही असते स्वस्त.

नको असते उंच शिखर,
छोटंसं टेकाड पुरेसं असतं.
मन भरून गप्पा मारायला,
जर कुणी असेल मस्त.

याच त्या वयामध्ये,
विश्रांतीला नसतो वेळ.
उमेदीच्या गावावारती,
प्रयत्नांची असते गस्त.

हेच तर ते वय असतं,
जिथे नेमकं मन फसतं.
नजरेतले कळता भाव,
लाडे लाडे गाली हसतं.

नेमकी याच वयात,
कुणी लिहिली ज्ञानेश्वरी,
किंकाळी फोडण्या दिल्ली दरबारी,
कुणी होते पुरे व्यस्त.

याच त्या कोवळ्या वयी,
देशासाठी स्वीकारली फाशी,
कुणी वाचवण्या आपली झाशी,
भय फेकुनी कंबर कसत.

हेच ते वय असतं,
जिथे मन आपलं नसतं.
इथे नेमकी चुकते वाट,
कुणा नेमकं गाव गवसतं.

इथे ना चुकीला शाप असतो,
ना कधी पश्चाताप असतो.
येईल ते भोगण्याला,
इथे खुलं दार असतं.

याच वयात आयुष्याचा,
नेमका लागतो डाव जुगारी.
हुकमी पण नसतानाही,
उद्यासाठी पानं पिस्त.

बेपर्वाई वागण्यात असते,
पण आदर्शांना नसतो विसर.
उनाडकीच्या पंखाखाली,
निरागसतेचं पाखरू वसत.

.......अमोल राणे