Friday, December 31, 2010

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लागली चाहूल नव वर्षाच्या आगमनाची,
जुने विसरून सारे धावणारी आशा मनाची.
रोज तेच जीवन, तीच नाती,
तीच नोकरी, तेच साथी.
पण तरी असतात मनी विश्वासाचे दोर हाथी,
याच विश्वासाने जगायची असते  कंटाळवाणी घडी जीवनाची.
कधी थकवा जाणवतो, क्षीण येतो सार्यांचा,
आणि मनात जाळ उठतो मग जुन्या आठवणींचा,
ती केलेली मजा, एकत्र घालवलेले क्षण,
कधी हसत गेलेले, कधी फिस्कटलेले क्षण,
आणि हेच पुन्हा चेतना  देतात नव काही जगण्याची.
जुनं वर्ष गेलं तसं पुढलही जाईलच.
आणि शांत आपण बसल्यावर एकदा तरी सर्वांची आठवण येईलच.
आता जरी आहोत आपण नव्या आयुष्याच्या  वळणावरती,
तरी देवा कडे एकच विनंती न विसर पडू दे आम्हा एकमेकांचा कधी,
आस मनात ताजीच असावी एकमेकांना भेटण्याची.


नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

अमोल

Tuesday, December 21, 2010

ओढ

कोणतीही ओढ लागली या मना,
येणाऱ्या वाटेकडे पाहतो हा कुणा,
बदललेले भाव सारे बदललेल्या संवेदना,
बदललेले विश्व मनीचे बदलल्या खुणा,
भांबावते मन राहत नाही भाना,
कळते तुला जरी मलाही सांगना.

अलगद निसटून जातो मुठीतून माझ्या,
अलवार शिरू पाहतो मिठीत कुणाच्या,
नव्हत्या अश्या तऱ्हा पूर्वी या मनाच्या,
नव्हत्या अश्या कधीच अधिरश्या, बेभानश्या.

अजानते स्वर, अजानते हे सूर,
हि सरगम हि नवीनवेली फुलते वेळीअवेळी,
रूप हि अजानते केवळ फसवे भास हे,
फुलल्या तरी मनी या किती अबोली...... किती चमेली.

हा वेगळा अनुभव आहे हि वेगळी प्रचीती,
पुसटसे बिंब केवळ उमटते चित्ती,
नावही नसे ठावे, ठाऊक नसे कि कोण आहे,
पण माझ्या एकांतात केवळ त्याची खुमार राहे.

त्याची हि अवस्था होते का अशी,
तोही झुरतो का रोज अधीर मनाशी,
होईल भेट जेव्हा कळेल का त्याही,
कि आहोत जवळीच आणि भेटही होत नाही.

हीच जाग सदा होते अंतरी,
मी नाही एकटा सोबत आहे कुणीतरी,
भेट होईल आज वा उद्या ना तरी,
भेटतील हे दोन जीव या प्रीत सागरी.

......अमोल

Thursday, December 16, 2010

बिझी बाबा

बालपणीच्या व्यथा:

तुला कधी भेटलाच नाही का रे  वेळ माझ्यासाठी,
आणत राहिलास फक्त नवे नवे खेळ माझ्यासाठी.

आईच्याच पदराची सदा होती माया माझ्यावरी,
तू दिसभर खंगून जमवत होतास मरगळ माझ्यासाठी.

बघ आठवतं का कधी घेतलस मला खांद्यावरी,
घरी आलास का संध्याकाळी कधी सरळ माझ्यासाठी.

पुरवत होतास सारं काही चुकता बेहीशेबही,
मिरवाव खांद्यावरून कधी वाटली का तळमळ माझ्यासाठी.

मी बसून असायचो लाऊन आस, सांजेला दाराकडे,
पण नीट बघायलाही नसायचं तुझ्याकडे बळ माझ्यासाठी.

जाणीवेच्या उंबरठ्यावर:

आता मला सवय झालीय तुझी असूनसुद्धा नसण्याची,
पण टोचते मनात तू भोगलेली हर कळ माझ्यासाठी.

मी फिरतो आता वाटेवरी फुलांच्या मखमालींच्या,
सावलीत ठेऊन मला, सोसलीस उन्हाची झळ माझ्यासाठी.

 निर्वाणीच्या वेळी :

तुझ्याशी खूप बोलायचंय, तुझही खूप ऐकून घ्यायचय,
निदान भांडण्यासाठी तरी काढना एक संध्याकाळ माझ्यासाठी

मला आता पंख फुटलेत, तुझी शरीरही शांत झालंय,
मोकळ्या आभाळात जाणवते तू सहन केलेली होरपळ माझ्यासाठी.

.......अमोल