Friday, January 28, 2011

तो एक वैरागी संन्यासी

तो एक वैरागी संन्यासी,
मी संसारातला हौशी,
तो उभा त्या पलीकडे,
मी उभा या अलीकडे,
दोघांची वाट समांतर,
चालतो मुक्तीची वाट निरंतर.
तरीही दोघांमध्येही अंतर.

त्याकडे रिकामी झोळी,
मजकडे विचारांची मोळी,
तो शोधतो मोकळे आभाळ,
मी आभाळाखाली छप्पर,
तो मुक्त व्हावया बघतो,
मी मोहाची शोधतो खापर.

तो देव शोधतो एकांती,
मज सदैव असते भ्रांती,
त्यास  भूतकाळातली खंत,
ना भविष्याची चिंता.
मी सोडवतो मात्र सारखा,
त्रीकालातला गुंता.

समोर त्याच्या सदा,
चैतन्याचे दिवे.
उडतात माझ्या समोर,
वासनेचे थवे.
अंतरी त्याच्या त्यागाचे,
सदैव पडती सडे.
सुखाच्या माझ्या कल्पनेला,
वारंवार तडे.
विरक्तीची तोरणे सदा,
त्याचा मंडपी चढे.
नात्याची सूक्ष्म जाळी,
पाय माझा आतून आतून ओढे.

त्याच्या जागेवर तो खरा,
माझ्या जागेवर मी बरा.
दोघं चालत राहू वाट,
पूर्वी होती जशी.
तो एक वैरागी संन्यासी,
मी संसारातला हौशी.


.......अमोल

No comments:

Post a Comment