जातानाचे ठसे होते चार पाऊलखुनांचे ,
येतानाच्या केवळ दोनच होत्या त्या वाळूत,
मी अनुभवलंय ! सागर सारं काही सामावून घेतो.
ओले चिंब अंग विरघळत होते,
समुद्राच्या खारट पाण्यात त्या,
अंगाबरोबर आनंद कधी विरघळला कळलंच नाही.
त्या दिवशीही लाटे सारखाच आवेग होता,
छातीशी येऊनही न धरता आला असा तो क्षण होता,
किनाऱ्याच दुखं मला त्या दिवशी कळलं होतं.
माझं सारं काही त्या लाटेने वाहून नेलं,
सावळीशी मखमलही तळहातावरना तेव्हाच गेली,
लाज सांभाळणारी चुनर केवळ होती माझ्या निर्लज्जपणासाठी.
मी भूतकाळ विसरत चाललोय,
पण ते क्षणच मला विसरत नाहीयेत,
म्हणून तर ते भेटायला येतात आठवण बनून.
किनाऱ्यावरची वाळू अजून दोन परतीच्या पावलांचा हिशेब मागतेय,
त्या दिवसापासून न तेवलेल्या दिव्यांचा सांज जाब विचारतेय,
मी काय करू? काही प्रश्नांना उत्तरच नसतात.
रित आहे संद्याकाळी सूर्यास्त होण्याची,
माझातर चंद्रही तेव्हाच मावळला होता,
दोन अंधार झालेले! एक पुसला गेलाय, एक अजून रुसलाय.
ते म्हणतात कि देव ऐकतो, मी हि हाक मारलेली,
म्हणतात त्याच्या घरी देर आहे, अंधेर नाही,
पण आता मला काय करायचंय.
.....अमोल
No comments:
Post a Comment