Thursday, February 24, 2011

मला आता कळायला लागलंय

मला आता कळायला लागलंय......
मी ज्यांना आपलं म्हणत होतोत्यांपासूनच मन आता पळायला लागलंय.

आता नकोसा वाटतो सहवास त्यांचा,
नकोसा वाटतो संग,
मी विसरतो आता कि, तेही कधी होते माझ्या भूतकाळातले अंग,
आनंदाचे रंग,
उत्साहाचे तरंग,
आज सारेच बेरंग, बेचिराख.
ते भेटतात तेव्हा मी हसतो फक्त,
पण त्य भेटीत ती तळमळच नसते जी असायची पूर्वी कधी.
आज त्यांच्या दिशेने पडणारं पाऊल आपसूक दूर दूर वळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

आता उरलीच नाहीये ती आर्दता,
ती आर्तता,
ती विश्वासाची पात्रता,
आता... आता त्रास होतो ते झरलेले क्षण आठवातांना,
नि मनाची तयारी नसताना पण कोण्या अज्ञात कारणास्तव शरीराला त्यांच्याकढे पाठवताना
जाता जाता उत्साहाच एक एक पण हळू हळू गळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

मला आवडतात नाती सांभाळायला, गोंजारायला,
त्यांवरती बागडायला, तरंगायला, उडायला,
पण त्यातला आतआतला परकेपणा, खोटेपणा,
यामुळे मला जड झालीयेत हि नाती,
या गाठी,
ज्या मीच बांधल्या होत्या फार दूरच्या क्षणांसाठी,
पण आता वाट्टेल ते कारण सांगून मी निघून येतो तिथनं....
मग त्यांना राग आला तरी चालेल...
उगाच खोटं खोटं हसून मनाला दुखी ठेवण्यापेक्षा एकांतात रडल्याच समाधान तरी भेटेल.
याला माझा पळपुटेपणा म्हणा,
धूर्तपणा म्हणा,
बेफिकिरी म्हणा,
कि म्हणा मला नातीच सांभाळता येत नाहीत,
मला चालेल.....माझा हळवेपणा तुम्हाला कसा कळेल..
हि मनातली तळमळ,
विचारांची खळबळ,
काळजाच्या जखमेची हळहळ तुम्हाला नाही कळणार.
हे सांगतानाही शांत जखमेवरच विस्मरणाच औषधदेखील आता भळभळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

....अमोल

1 comment: