Tuesday, April 5, 2011

वरी दिसतो प्रसन्न परी आत उदास आहे

आजकाल आपण मनाचे एक गाव सोडून एका वेगळ्याच दिशेला धावत असतो. तसे तेही योग्यच आहे म्हणा, स्वप्नात जरी भूक लागली नाही तरी प्रत्येक्षात मात्र लागते आणि म्हणून स्वप्न विसरून भेटेल ती वाट धरून जायचे असते. पण जरी तथकथित सारे काही मिळाल्यानंतरही मनात एक कोपरा मात्र उदास असतो, काही तरी अपुरं आहे म्हणून. त्या मनाची ही कविता.

कधी कधी घराचा विशिष्ट दबाव, एक घालून दिलेली समज, त्यात आपण आदर्श आहोत याची जाण, म्हणून एक टाळेबंदी जीवन जगावे लागते. जरी त्याचा कंटाळा आला, मनाला पटत नसले तरी आदर्श पाळायचे असतात त्यात मग मनाच्या ईच्छेचा विचार करायचाच नसतो आणि म्हणून सुद्धा मन उदास असते आणि सर्व काही चांगल जगण्यासाठी असताना उदासीन आयुष्य जगतो. मग अशा वेळी फक्त जवाबदारी पार पडत किंवा त्याच साठी जगायचं असतं आणि काय ?


वरी दिसतो प्रसन्न परी आत उदास आहे,
जरी भेटले सारे तरी अपुरा हव्यास आहे.

दिन रात जगतो तसेच ठरविल्याप्रमाणे,
जगणे तरी कसले? जणू "काल" "आजगिरवल्याप्रमाणे,
आणि "उद्या"ही तसाच येईल "आज" सरवल्याप्रमाणे.
वाट जरी शिखराची आणि झेंडा जरी विजयाचा,
तरी आतून मी खचलेला आणि खचलेला श्वास आहे.

समजायला लागल्यापासून जिंकायचा धाक आहे,
आदर्शांच्या ओझ्याखाली ईछांची राख आहे.
काटे तुडवायचे पायाने नंतरच फुले कुरवाळायची,
ठरवून दिली  जशी दिशा तशीच वाट चालायची.
जरी मान्य उपदेश नाही तरी पाळायचा निजध्यास आहे.

उद्याचा श्वासासाठी "आज" द्यायचा आहे,
आजच्या खांद्यांवरती बोझा उद्याचा आहे.
जीवास मान्य नसतो हा खेळ उदारीचा,
म्हणून लाऊन घ्यायचा लळा जवाबदारीचा 
मग शिरशिरात देतो त्राण  जो लपलेला ध्यास आहे.

स्वप्नातले गावच जरी निराळे आहे,
विसरून ते सारे जगायचेच वेगळे आहे.
दिसू दे सारयास जगणे माझे सुखातले,
त्यांना कळणार नाही स्वप्न काय उरातले.
आणि काय कळेल त्यांस काय कमी समाधानास आहे.

...अमोल

No comments:

Post a Comment