Monday, June 20, 2011

आता चिडायचं नाही

आता चिडायचं नाही, ओरडायचं नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

आता कविता लिहायची स्वतःसाठीच,इतरांसाठी नाहीच मुळी
वाहवा स्वतःच द्यायची जरी वाटली कल्पना खुळी,
पण आवडणार नाही कुणाला म्हणून पान फाडायच नाही.

वाचता येईल तितक खोल उतरून वाचायचं मन समोरच्याच,
पण त्रयस्तपणे.
पान वाचताना आवडलं म्हणून दुमडायच नाही,
कि आवडलं नाही म्हणून वाचताच परतायचं नाही.
आणि कितीही असह्य झालं तरी स्वतःच पुस्तक इतरांसमोर उघडायच नाही.

चालताना वाटेमध्ये जुने जुने ओळखीचे भेटतील,
आठवणींचे ढिगारे खूपच खोल खणले तरी हरकत नाही,
पण एकाही खड्ड्यात आता बुडायचं नाही,
चालत राहायचं दूर दूर, नाही जमलं तर बसायचं वाटेतल्या दगडावरती,
पण किती वाटला दगड मोहक तरी आपला नाव त्यावर कोरायच नाही.

खोल खोल दऱ्या भेटतील मार उड्या,
उंच उंच डोंगरावरही चढायला घाबरू नकोस,
पण सावरायला नसेल कोणी म्हणून सांभाळून जा, पडायचं नाही,
आणि पडलास तरी हसायचं, रडायचं नाही.

आता झरलेले क्षण पुन्हा येतील पुढ्यात बसायला,
झालेल्या चुकांचे दोष शोधत राहायचं नाही,
येईल ते भोगायचं पण त्यांच्याशी भांडायचं नाही,
त्यातना शिकता येईल तेवढं शिकायचं, घडायचं, त्यांच्यावर बिघडायच नाही.
आता फक्त हसायचं, रडायचं नाही.

.....अमोल

2 comments: