Sunday, December 25, 2011

अनोळखी


मी  माझ्यातच  गुंतलेला,
तरी  बेभान  सुटलेला,
माझे  गीत  गाण्यासाठी,
नव्याने  कंठ  फुटलेला.

मीच  मला  सुचलेला,
तरी  हि  ना  रुचलेला,
जीवनाच्या  वजाबाकीतून,
स्वतःला  वेचलेला.

मी  स्वतःशीच  रुसलेला,
मी  स्वतःवर  हसलेला,
जगण्याच्या  शब्द  देऊन,
स्वतःशीच  फसलेला.

मी  माझ्यातच  बुझलेला,
नवा  कोंब   रुजलेला,
एकट्या  माळरानी,
एकांताने  गजबजलेला.

मी  तोच  विरलेला,
मीच  तो  हरलेला,
नव्या  या  ऋतूत,
नव्याने  बहरलेला.

मी  तोच  जुना,
मीच  तो  नवा,
कंटाळ्याची  वाट  कधी,
कधी  सोबतीचा  थवा.

मी  तोच  शहाणा,
मीच  तो  दिवाना,
जुनेच  जीवन  नव्याने,
जगणारा  केविलवाणा.

मी  तेच  गात्र,
मी  जुनेच  पात्र,
पाऊस  जरी  नवा  हा,
वाहणे  तसेच  मात्र.

मीच  माझी  आशा,
मीच  माझी  निराशा,
मीच  अंधार  माझा,
मीच  माझा  कवडसा.

मी  रोग  मला  जडलेला,
मी  भोग  जुना  सडलेला,
जीवनाच्या  आकांताने,
माझ्यावरतीच  चिडलेला.

मी  मातीमी  वायू,
मी  आगपाणीआकाश,
मी  शून्यमी  टिंब,
मी  एक  नश्वर  भास.

मीच  माझा  श्वास,
माझाच  मला  फास,
मृत्युच्या  वाटेवरती,
जिवंतपणाचा भास.

मी  दिशांचा  भरकटलेला,
मी  विचारांचा  खरकटलेला,
मी  त्याच  जुन्याश्या,
चालींचा  मळकटलेला.

मी  किनारा  नदीचा,
वा  झरा  त्या  आधीचा,
आज  जरी  मी  समुद्र,
तरी  थेंब  पूर्वी  कधीचा.

मी  असा  मी  तसा,
ना  जाणो  मी  कसा,
माझ्यातच  राहून  मी,
मलाच  ना  ओळखणारा  फारसा.     

................अमोल

No comments:

Post a Comment