Sunday, August 21, 2011

आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो


आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो,
अळवावरल्या  पाण्याच्या थेंबासारखं असतं आमचं,
क्षणभराचं सुखं, क्षणभराचं दुखंसुद्धा,
तरी सुद्धा खोल खोल भावनेची ओल असते मनात,
आमचं हसणं, रुसणं सारं काही असतं क्षणाचं,
कारण विचारांपेक्षा आम्ही ऐकतो आमच्या हळव्या मनाचं.
क्षणात होतो इंद्रधनू, क्षणात काळोखी रात्र होतो.
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

स्वप्नांना जपतो आम्ही, स्वप्नांना जगतो आम्ही,
तुम्हाला उगीच वाटतं वेड्यासारखं वागतो आम्ही.
स्वप्नांसारखं मधीच भंग पावतो कधी,
स्वप्नांसारखंच नव्याने पुन्हा जन्म घेतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

अधल्या मधल्या गोष्टींशी आमचं जुळतच नाही,
टोकाच्या भूमिकेशिवाय आम्हाला काही कळतंच नाही,
एकदा विश्वास बसला कि काही केल्या उठत नाही,
आणि एकदा विश्वास उठला कि काही केल्या बसत नाही.
प्रेम हि आमचं जिवापार आणि रागही अगदी तीव्र असतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

आयुष्यातली प्रत्येक संवेदना आम्हाला स्पर्शून जाते,
निरर्थक गोष्टही आमचा फार वेळ खर्चून जाते,
हव्या त्या गोष्टीत विनाकारण दुर्लक्ष होतो,
पण भोळंभाबडं मन वेगळीकडेच एकलक्ष होतो,
यशअपयशाच्या शर्यतीत आम्ही नेहमी शेवट गाठतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

छत्री असून सुद्धा आम्ही भिजत जातो,
चपला घेऊन हातात चिखलात उगी चालत राहतो,
पाऊस बोलतो आमच्याशी, वारासुद्धा बोलतो,
माती बोलते आमच्याशी, आभाळही मन खोलतं,
जमिनीवरलं हिरवं गवत जणू आमच्यासाठीच डोलतं.
पावसाचा गंध मित्रासारखा आणि ती सर भासते मैत्रीण,
आणि वाटते त्या कडकडनाऱ्या विजेशीही आहे जुनी वीण,
अश्या कईक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत रहातो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.



आम्हाला तुमच्याकडून हवी असते थोडी माया,
अगदी खर्रखुर्र प्रेम आणि आपुलकीची छाया,
आमचं काळीज तळहातावरती घेऊन फिरतो आम्ही ,
पण तिळाएवढाही खोटेपणा सहन करता येत नाही,
भावनांवर नसतो ताबा आणि आसवांशी पक्क नातं असतं,
दुरावा नको असतो म्हणून मन मनाची जवळीक जपत बसतं.
जरी आम्हाला तुमची गरज तरी सांभाळून घ्या ही विनंती करतो.
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो



कधी कधी आम्ही तुमचा राग करतो पण लक्षात ठेवत नाही,
हळवेपणाच्या कक्षेत फार काळ काही टिकतच नाही,
तुम्ही घेता राग साहजिकच तुमच्या मनावर,
पण भावनेच्या भरात आम्हीच नसतो भानावर,
वेळ गेल्यानंतर आमचा व्रण मग चिघळत  जातो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो,
अगदी काचेच्या वस्तुसारखी नाजूक,
तुम्हीच जपायचं असतं आम्हाला जिवापार,
नाहीतर आम्ही स्वतः तरी जखमी होतो,
नाहीतर तुम्हाला तरी जखमी करतो,
आम्ही हळवी मानसं हि अशीच असतो.

.......अमोल



Friday, August 12, 2011

नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी

नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी,
अन जागते मनात मिलनाची आसही.
विसरुनी देहभान निघे प्रितबावरी,
नवीन वाट चालण्याची अन नवा प्रवासही.

यमुनेचा तट ओला राधेच्या नयनांपरी,
कान्हास का तरी सुचे अशी खुशमस्करी.
वाजवी लपुनी  बासरी  येई ना सामोरी का?
थकली राधा बिचारी मारुनी त्याला हाका.
प्राण कंठागत आले श्वासही मंदावला,
होईना सहन विरहाची कळ अंतरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.

हताश झाली राधिका फिरताना माघारी,
जड झाली पावले जाववेना रिते घरी.
मग येई कान्हा देई तिला मागून मिठी,
तरंग उठती मनात सुखावते तनु तिची.
अबोल होते क्षणात बोले ना शब्द ती,
गालात गोड रुसवा ओठात कोर हासरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.
स्वरपंक्ती कान्हाच्या साठवे मनोमनी,
हरपुनी देहभान पाहे त्याच्या लोचनी.
रंग चढे रातीला चांदणे येई खुलुनी,
पौर्णिमेचा चंद्रही त्यांसवे ये फुलुनी.
तल्लीनता पावली सजताना रास अशी,
आत्म्यांसवे होतसे पवित्र प्रित साजरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.


......अमोल 

Tuesday, August 9, 2011

यंदाच्या पावसात एवढंच कर

मला नेहमी असं वाटत असतं कि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या काही स्वच्छ जागेवर लोकंच घाण करायला सुरुवात करतात आणि मग ती जागा स्वच्छ, पवित्र होती यावर विश्वासच बसेनासा होतो, तसंच काहीसं आता समाजात स्त्रिया, मुली यांबरोबर झालंय(यात माझी बहिणही आलीच), पूर्वी कसं शिकवलं होतं त्या रुपात आई, मावशी, आत्या ,ताई, नाहीतर मैत्रीण पण आता सर्रास item ,  फटाका, माल, छामिया असं  बोललं जातं, बघितलं जातं. असं रोज उंबऱ्यातून बाहेर  पडल्यावर ते परत उंबऱ्यापर्यंत  येई पर्यंत(रस्ता -नाका-रिक्षा-स्टेशन -जिना -लिफ्ट-office - आणि पुन्हा return )  तुम्हालाही ऐकायला मिळत असेलच, चीडही येत असेल, म्हणून माझा गाऱ्हाणं त्या पावसाला आहे कि बाबा तुझ्याशिवाय आता या सगळ्यांवर चढलेली हि घाणीची आवरणं धुण्याची शक्ती इथे कुठल्याच पुजार्यात नाही ,कुणातच नाही तुच यांना पवित्र अभिषेक घाल आणि पुन्हा आम्हाला या देवीत आमची आई, ताई, मावशी, मैत्रीण आहेच पण दाखव सुद्धा. (काही शब्द चुकले असतील तर कृपया माफ करा हि नम्र विनंती.)

.
.
.
पण त्यासाठी फक्त तू यंदाच्या पावसात एवढंच कर


यंदाच्या पावसात एवढंच कर,
घराबाहेर पडून भिजून घे अंगभर.

पावसाच्या तीव्र माऱ्यातून,
निघून जाऊदेत तुझ्यावरल्या खपल्या,
लोचट नजरेच्या कामुक स्पर्शाच्या,
ज्या लाचारीस्तव होत्या जपल्या.
आणि दिसू देत पूर्वीसारखी त्यातून,
तीच निरागस पवित्र मूर्ती,
अंतरबाह्य निर्मळ बेकलंक अशी,
जशी समाजात येण्यापूर्वी होती.
अंगावरली मलीनतेची प्रावरणं,
धुण्यासाठी घे तो पाऊस अंगावर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

भिजताना ती अंगावरली,
ओढणी सारून ठेव बाजूला,
तीही आता थकली असेल,
त्या नजरांपासून वाचवून तुला.
आणि रुंद कर ती छाती जरा,
तीही स्वच्छ घे त्यात धुऊन,
भडव्यांची नजर तिथंही असते,
भूक भागवली दुध जिथना पिऊन.
त्वचेवरल्या रंध्रारंध्रात त्या,
शुद्ध पावसाचे थेंब भर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

पुन्हा तू बाहेर पडशील,
तेव्हा होणारच पुन्हा तसं,
पण त्यापासून वाचण्याच,
तुलाच जमवायचंय धाडस.
कधी सहानुभूती कधी आमिष,
तर कधी वेगळंच भासवतील काही,
तूच सावरायचं तुला त्यातून,
पण अजिबात घाबरायचं नाही.
त्या अस्पृश्य नजरेंनी दिलेल्या घावांचा ,
या पावसात होऊ दे विसर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

मला माहित आहे जरी,
तुला आलाय पार कंटाळा,
पण असंच जगायला शिकवते,
हि जगण्याची शाळा.
तुला जरी असह्य झाल्यात,
या पदोपदी बोचऱ्या नजरा,
मनातलं दुखं मनात ठेऊन,
करायचा दिवस साजरा.
बापाच्या मायेने आलाय हा पाऊस,
त्याच्या कुशीत मन मोकळं कर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

........अमोल

Sunday, August 7, 2011

विज्ञानरुपी विठ्ठल
















विज्ञानरुपी विठ्ठल  उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर,
आणि प्रगतीचे दोन्ही हात घेउनिया कटेवर.
माहितीरूपी कुंडले श्रवणी तळपती,
संशोधनरुपी माळा गळ्यामध्ये रुळती.
नाविन्याचे पितांबर नेसुनिया साजिरे,
प्रबोधनरुपी चंदन लाउनिया अंगभर,
विज्ञानरुपी विठ्ठल  उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर.

असाध्य अश्या रोगांना देऊनिया शिक्षा,
सुखकर करतो मानवी जीवनाच्या परीक्षा.
वांझोट्या मातृत्वालाही देई संतानाची प्राप्ती,
यश गवसे हमखास अशी याची महती.
नवनवीन शोधांनी उडवी अज्ञानाची दाणादाण,
सफल करी आयुष्य वापरून बुद्धीचे वरदान.
नव्या औषध इलाजांनी ना मृत्यूचेही डर,
विज्ञानरुपी विठ्ठल  उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर.

संवादाचे नवे साधन शोधून काढला दूरध्वनी,
कितीही असो दूर कुणी, संपर्क होई हवा त्या क्षणी,
आकाशात उडण्यासाठी दिले पंखाचे विमान,
मिसाईलरुपी अस्त्र दिले शत्रूवर साधण्या संधान.
इंटरनेट काय 3G  काय सारी किमया त्याची,
विवेकाने वापरून विज्ञान करण्या सेवा मानवतेची,
याच भगवंताने घडविली परग्रहावरही सफर,
विज्ञानरुपी विठ्ठल माझा उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर

.....अमोल