Friday, August 12, 2011

नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी

नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी,
अन जागते मनात मिलनाची आसही.
विसरुनी देहभान निघे प्रितबावरी,
नवीन वाट चालण्याची अन नवा प्रवासही.

यमुनेचा तट ओला राधेच्या नयनांपरी,
कान्हास का तरी सुचे अशी खुशमस्करी.
वाजवी लपुनी  बासरी  येई ना सामोरी का?
थकली राधा बिचारी मारुनी त्याला हाका.
प्राण कंठागत आले श्वासही मंदावला,
होईना सहन विरहाची कळ अंतरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.

हताश झाली राधिका फिरताना माघारी,
जड झाली पावले जाववेना रिते घरी.
मग येई कान्हा देई तिला मागून मिठी,
तरंग उठती मनात सुखावते तनु तिची.
अबोल होते क्षणात बोले ना शब्द ती,
गालात गोड रुसवा ओठात कोर हासरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.
स्वरपंक्ती कान्हाच्या साठवे मनोमनी,
हरपुनी देहभान पाहे त्याच्या लोचनी.
रंग चढे रातीला चांदणे येई खुलुनी,
पौर्णिमेचा चंद्रही त्यांसवे ये फुलुनी.
तल्लीनता पावली सजताना रास अशी,
आत्म्यांसवे होतसे पवित्र प्रित साजरी.
नादते अंतरंगी श्यामवर्णी बासरी.


......अमोल 

Tuesday, August 9, 2011

यंदाच्या पावसात एवढंच कर

मला नेहमी असं वाटत असतं कि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या काही स्वच्छ जागेवर लोकंच घाण करायला सुरुवात करतात आणि मग ती जागा स्वच्छ, पवित्र होती यावर विश्वासच बसेनासा होतो, तसंच काहीसं आता समाजात स्त्रिया, मुली यांबरोबर झालंय(यात माझी बहिणही आलीच), पूर्वी कसं शिकवलं होतं त्या रुपात आईमावशीआत्या ,ताईनाहीतर मैत्रीण पण आता सर्रास item ,  फटाकामालछामिया असं  बोललं जातंबघितलं जातंअसं रोज उंबऱ्यातून बाहेर  पडल्यावर ते परत उंबऱ्यापर्यंत  येई पर्यंत(रस्ता -नाका-रिक्षा-स्टेशन -जिना -लिफ्ट-office - आणि पुन्हा return )  तुम्हालाही ऐकायला मिळत असेलच, चीडही येत असेल, म्हणून माझा गाऱ्हाणं त्या पावसाला आहे कि बाबा तुझ्याशिवाय आता या सगळ्यांवर चढलेली हि घाणीची आवरणं धुण्याची शक्ती इथे कुठल्याच पुजार्यात नाही ,कुणातच नाही तुच यांना पवित्र अभिषेक घाल आणि पुन्हा आम्हाला या देवीत आमची आई, ताई, मावशी, मैत्रीण आहेच पण दाखव सुद्धा. (काही शब्द चुकले असतील तर कृपया माफ करा हि नम्र विनंती.)

.
.
.
पण त्यासाठी फक्त तू यंदाच्या पावसात एवढंच कर


यंदाच्या पावसात एवढंच कर,
घराबाहेर पडून भिजून घे अंगभर.

पावसाच्या तीव्र माऱ्यातून,
निघून जाऊदेत तुझ्यावरल्या खपल्या,
लोचट नजरेच्या कामुक स्पर्शाच्या,
ज्या लाचारीस्तव होत्या जपल्या.
आणि दिसू देत पूर्वीसारखी त्यातून,
तीच निरागस पवित्र मूर्ती,
अंतरबाह्य निर्मळ बेकलंक अशी,
जशी समाजात येण्यापूर्वी होती.
अंगावरली मलीनतेची प्रावरणं,
धुण्यासाठी घे तो पाऊस अंगावर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

भिजताना ती अंगावरली,
ओढणी सारून ठेव बाजूला,
तीही आता थकली असेल,
त्या नजरांपासून वाचवून तुला.
आणि रुंद कर ती छाती जरा,
तीही स्वच्छ घे त्यात धुऊन,
भडव्यांची नजर तिथंही असते,
भूक भागवली दुध जिथना पिऊन.
त्वचेवरल्या रंध्रारंध्रात त्या,
शुद्ध पावसाचे थेंब भर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

पुन्हा तू बाहेर पडशील,
तेव्हा होणारच पुन्हा तसं,
पण त्यापासून वाचण्याच,
तुलाच जमवायचंय धाडस.
कधी सहानुभूती कधी आमिष,
तर कधी वेगळंच भासवतील काही,
तूच सावरायचं तुला त्यातून,
पण अजिबात घाबरायचं नाही.
त्या अस्पृश्य नजरेंनी दिलेल्या घावांचा ,
या पावसात होऊ दे विसर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

मला माहित आहे जरी,
तुला आलाय पार कंटाळा,
पण असंच जगायला शिकवते,
हि जगण्याची शाळा.
तुला जरी असह्य झाल्यात,
या पदोपदी बोचऱ्या नजरा,
मनातलं दुखं मनात ठेऊन,
करायचा दिवस साजरा.
बापाच्या मायेने आलाय हा पाऊस,
त्याच्या कुशीत मन मोकळं कर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

........अमोल

Sunday, August 7, 2011

विज्ञानरुपी विठ्ठल
















विज्ञानरुपी विठ्ठल  उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर,
आणि प्रगतीचे दोन्ही हात घेउनिया कटेवर.
माहितीरूपी कुंडले श्रवणी तळपती,
संशोधनरुपी माळा गळ्यामध्ये रुळती.
नाविन्याचे पितांबर नेसुनिया साजिरे,
प्रबोधनरुपी चंदन लाउनिया अंगभर,
विज्ञानरुपी विठ्ठल  उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर.

असाध्य अश्या रोगांना देऊनिया शिक्षा,
सुखकर करतो मानवी जीवनाच्या परीक्षा.
वांझोट्या मातृत्वालाही देई संतानाची प्राप्ती,
यश गवसे हमखास अशी याची महती.
नवनवीन शोधांनी उडवी अज्ञानाची दाणादाण,
सफल करी आयुष्य वापरून बुद्धीचे वरदान.
नव्या औषध इलाजांनी ना मृत्यूचेही डर,
विज्ञानरुपी विठ्ठल  उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर.

संवादाचे नवे साधन शोधून काढला दूरध्वनी,
कितीही असो दूर कुणी, संपर्क होई हवा त्या क्षणी,
आकाशात उडण्यासाठी दिले पंखाचे विमान,
मिसाईलरुपी अस्त्र दिले शत्रूवर साधण्या संधान.
इंटरनेट काय 3G  काय सारी किमया त्याची,
विवेकाने वापरून विज्ञान करण्या सेवा मानवतेची,
याच भगवंताने घडविली परग्रहावरही सफर,
विज्ञानरुपी विठ्ठल माझा उभा तंत्रज्ञानाच्या  विटेवर

.....अमोल

Monday, August 1, 2011

जगण्यापुढचं प्रश्नचिन्ह ??????

माझ्या या आयुष्यावर काढा काही तरी उपाय,
अहो आयुष्य जगण्याचा मार्ग तरी काय.

कुणी म्हणे जग मिथ्या कुणी म्हणे सत्य,
कुणी म्हणे माया कुणी सर्वस्व म्हणतं.
कुणी म्हणे भोगावी वासना सारी,
कुणी म्हणे त्यागाचीच दुनिया न्यारी.
कुणी म्हणे विचारांची धरावी कास,
कुणी म्हणे पैश्यांचीच करावी रास.
एकटा मी कसे ठेऊ दोन दगडांवर पाय.

अहिंसेत पुण्य आणि हिंसेत पाप,
तरी इथे लढणाऱ्याला म्हणती बाप.
नम्रतेने वागायचं आणि जरी बोलायचं खरं,
मुजोर खोटारड्यांचीच इथे मोठ्ठाली घरं.
रहावे कसेही परी असावा अंगी गुणं,
अहो सांगा हे सूत्र झालंय का आत्ता जुनं.
ताकदीच्या पुढे बुद्धीचे चालेचना हातपाय.

सारे देशवासीय असले बांधव जरी,
प्रांतवादाची इथे फार मोठो दरी.
सरकार सांगे नका मानू धर्म जात,
तरी जातीची जागा सरकारी रकान्यात.
भ्रष्टाचार थांबवा सांगे हर नेत्याचा घसा,
तरी करायला कामे त्यांचाच भरा खिसा.
इवल्याश्या मेंदूला कळेना कोणताच पर्याय.

निष्ठेने वागण्याचे जरी संस्कार झाले,
आणि सांगती आता घोर कलियुग आले.
असत्याचे पारडे होत नाही जरी जड,
पण सत्याचा मार्ग असे अवघड.
स्वैराचाराने वागणाऱ्याला मिळे बरा मान,
निराशाच पदरी पडे इथे वागून नियमानं.
मूल्यशिक्षणाचं पान काय जीवनातूनच फाडतायं.

जगावं स्वतःपुरतं कि इतरांसाठी जगावं,
सोसावं अपार जीवनी कि स्वार्थी बनावं
विसरून जावीत का सारी ऋणं,
कि जपत बसावी साऱ्यांची मनं.
वाढू द्यावा मत्सर वाढू द्यावा वाद,
कि व्हावे एकसंघ विसरून मतभेद.
दुधासारख्या आयुष्यावर शोभे ना अवगुणाची साय.

आस्तिकतेची धरून माळ जपावी का श्रद्धा,
कि नास्तिकतेच्या मशालीने शोधावा स्वतःत खुदा.
विज्ञानाची कास धरू कि जुनं ते सोनं म्हणू,
माणुसकीला  ओळखू पहिले कि दगडात देव मानू.
शिक्षणाच्या वापराने स्वतःपुरतं जगू,
कि मानवतेच्या कल्याणचं रणशिंग फुकू.या गोंधळलेल्या अवस्थेतून कधी बाहेर काढतायं.

..........अमोल.