Monday, April 1, 2013

तुझा शब्द


तुझा शब्द इतक्या हळुवार पडला कानी,
जसं पडावा अंगावर पहिल्या पावसाचं पाणी.

पहिल्यांदा नजर देऊन पहिली कुण्या ओठांची हालचाल,
शब्दच विसरलो त्या नादात अशी होती ती कमाल.

अलवारपणे खालचा ओठ स्पर्शत होता वरच्या ओठाला,
जितक्या अलवारपणे फुल सोडते ओघळताना देठाला.

त्या दोन सुंदर पाकळ्यांनी मनात सुरु केला दाह,
मोक्ष कुणीही सोडून द्यावा इतका मोहक होता तो मोह.

शब्दच माझे विसरून गेले त्यांच्या  अस्तित्वाच्या ओळी,
मौनाचे ऋणही फिटून गेले तू बोलत असते वेळी.

तुझा शब्द संपवत होता कल्पनेतले आणि वास्तवातले अंतर,
शासही स्वताचा ऐकू आला तू निघून गेल्या नंतर.

इतकं पुरेस होतं आता हा उरला जन्म जगण्यासाठी,
जन्मलो तर तीळ बनून जन्मेन  पुन्हा तुझ्याच ओठी.
..........अमोल 


ती बिनधास्त आहे,
तिच्या कर्तुत्वावर ती निर्धास्त आहे.
लढेल कोणत्याही संकटांशी,
इतकं तिच्यात धारिष्ट्य आहे.
ती बिनधास्त आहे.

तिचे विचार नवीन आहेत,
तिच्या कल्पनाही नवीन आहेत,
नवीन स्वप्न साकारण्याचे तिचे मार्गही नवीन आहेत.
तिच्या मनात भरारीचे निर्णय तरीही पक्के आहेत,
जरी पंखांवर पुरोगामित्वाचे अरिष्ट आहे.
ती बिनधास्त आहे.

तिच्या कडेही आहे एक स्त्रीमन,
ज्यात दडलंय एक हळवेपण,
जितक्या सहजपणे जाते office ला,
तितकी सहजपणे सांभाळते kitchen पण.
जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच मित्रही आहेत,
modern असली तरी सांभाळते
जाणीवेने आपुले स्त्रीधन.
मर्यादा ओलांडणार्यांसाठी,
तिच्यावरही चंडीकेचा वरदहस्त आहे.
ती बिनधास्त आहे.

ती थोडी नम्र आहे,
ती थोडी आगावू पोर आहे,
कधी अतिशय शालीन,
कधी दंगेखोर आहे.
घरही सांभाळते, स्वतःसाठीपण जगते,
जाणीवेने सार्या जगाकडे पाहते.
काळजातलं दुख कधी चेहऱ्यावर आणत नाही,
स्वताचा आनंद कधी एकटीचा मानत नाही.
चार गोष्टी सांगते कधी आईसारख्या समजावून,
कधी वागते अगदी वेड्यासारखी आपणहून.
अशी तशी कशी कशी पण जशी आहे तशी फार मस्त आहे.

..........अमोल 

Saturday, January 12, 2013

DESIGNATION

तुला आठवत असेल,
तुला, मला , आपल्या कुशीत रुजु घातलेल्या अंकुराशी,
कसे काय relation चे bond तोडावे लागले ते अगदी उमलायच्या आतच,
कारण आपण bond केला होता तसा त्यावेळी career साठी.
तेव्हा ती गोष्ट अगदीच normal वाटली होती,
पण "आता नको" या शब्दाचा future tense " कधीही नाही " असा होईल वाटलं नव्हतं.
नियतिनेही आपण दाखवलेल्या नकाराची परतफेड नकारातच केली आहे.





तेव्हा वेळ नव्हता,
आज वय नाही.
Director , Executive आणि CEO या पदांपर्यंत पोहोचलेलो तू आणि मी,
आयष्यात आई - बाबा या DESIGNATION ला कधीच पोहोचणार नाही.

..अमोल

Sunday, December 30, 2012

श्रावण रडत होता













दूरच्या रानात कुठे,
पाउस पडत होता.
इथे माझ्या कुशीत ओला,
श्रावण रडत होता.

त्या मोडक्या  काड्यांनी,
मातीही हळहळली थोडी.
घरट्याच्या दुख्खात बुडाली,
त्या पाखरांची जोडी.

ती वेळ सटवाईच्या,
शापाने बाधित होती.
एथे हि पदरात रिकाम्या,
गर्भास शोधीत होती.

मातृत्वाचा  झरा भिजवी,
देवकीच्या पदरास कोऱ्या.
त्या पश्चातापात कान्हा,
करी गोकुळात चोऱ्या.

..........अमोल

Monday, December 24, 2012

ते हॉस्पिटल मधले दिवस- २


चेहरे नव्हते जरी ओळखीचे पालखीचे,
समदुखाने बांधले नाते एका तळमळीचे.

दुख्खीतांच्या मेळ्यातला  झालो वारकरी,
कधी वर्णिली दुखे कधी झालो टाळकरी.

दुख्खीतांच्या मेळ्यांत  मी दुखाची ओवी गाईली,
काही दुखऱ्या पापण्यांत मी साक्षात पंढरी पाहिली.

अदखलपत्र होते दुख्ख एकमेकांचे एकमेका,
तरी जात होत्या कनवाळू मुखातून हाका.

धीर द्यावा कुणी कुणास सारे होते खचलेले,
ज्याच्या त्याच्या नशिबी दुख्ख भयाण रचलेले.

ज्याचे त्याचे प्राक्तन सजे भिन्न व्यथेच्या नक्षीने,
काही क्षणांस्तव झालो एक व्यथालयाच्या साक्षीने.

दुख्ख संचित संपता तिथे राहण्यास अधिकार नसतो,
वंदन माझे त्या तीर्थाला जिथे सुख्खाच धिक्कार असतो.

निघण्याची वेळ झाली दूर झाली पाउले,
उंच कट्ट्यावरून पाहती दोन डोळे किलकिले.

..........अमोल

Saturday, December 15, 2012

ते हॉस्पिटल मधले दिवस


असे विचित्र फासे पडती काळगतीला,
पाळण्यात पक्षीण पिल्लू जोजवी आईला.

त्या नियतीचक्रानी असाही डाव केला,
आधार केला लुळा, भार दिला बापला.

कर्म योगानेही  त्यांची निरखून पहिली निष्ठा,
बाप उताणा होता लेक काढी  विष्ठा.

चिंतेत रात्र अख्खी  विचार गोंधळ जागराला,
पोर बापासमोर आवरून पापण्यात सागराला.













अथांग काळजीचा डोंब उसळे काळजात,
सौभाग्याचा मिनमिन्ता दिवा लोळता अंथरुणात.

डोळ्यास नाही डोळा व्यथेत तुलसीची मालकीण,
घरी कालवा मायेसाठी निपचित पडली अर्धांगिन.

काळ गतीच्या घाल्यावरती माणुसकीची पडते फुंकर,
राबत असतो ईश्वरी सेवेसाठी हात  निरंतर.

भावनांचे  रूप आसवे तरीही त्यांना रंग नाही,
आशेची ओठांवर कोर काळजात लाही लाही.

अमोल

Sunday, July 15, 2012

असा पाऊस तसा पाऊस.


त्याच्याकडचा पाऊस

अरे थोड्या वेळ थांब येऊ दे तिला,
कोणीतरी सांगाना या वेड्या पावसाला.

कित्येक दिवसांनी हि भेट होणार,
त्याला सांगा थांबनको येऊ अडवायला.

नेहमी असेच होतेमाझे फसेच होते,
तुला का आवडते असे मला चिडवायला.

किती वेळ गेला असाच कोरडा कोरडा,
आताच सुचले कसे तुला तिला रडवायला.

नकोसनारे होऊ इतका कठोर तू,
तूच कारणीभूत होतास हि प्रीत घडवायला.

एकदाच तिला येऊ दे अन मिठीत  घेऊ दे,
मग नाही सांगणार कधी तुला जायला.

एकाच झाडाखाली निशब्द आम्ही असताना,
ये ना मग खुशाल हवे तसे भिजवायला.

कश्याला फुलवतोस हा निसर्ग सारा,
तुला तरी आवडेल का यात एकटे मिरवायला.

तुझे नावंच सांगतो फक्त येऊ दे तिला,
सांगतो तुझा कान धरून तुला ओरडायला.

अरे प्लीज तिला एकदाच येऊ देरे,
मग ये हवा तसा आणि हवे तितके राहायला.

______________________________________________________

तिच्याकडचा पाऊस

किती रे हा पाऊस कशी बाहेर येऊ,
तूच सांग घराबाहेर कसे पाऊल मी ठेऊ.

हा उलट सुलट वारा उधळतो छत्री,
आणि थांबेल कि नाही याचीही ना खात्री.

तू पण राजा ऐक नको राहूस भिजून,
संपल्यावर मीच येईन धावत इथून निघून.

हा निरोप लिहिल्या कागदाची सोडते हि होडी,
आज भेट नाही यावरच मन गोडी.

शपथ तुम्हा सारिंनो नका भिजवू हि नांव,
तुम्हीच करा सोबत हिला गाठायचे दूर गाव.

तुही कागदा ठेव जपून ह्या अक्षरांची शाही,
त्याला भेटल्याशिवाय बघा विरघळायचं नाही.

शब्दांनो जाऊन तुम्ही समजूत त्याची काढा,
सर्दी होईल म्हणावं त्याला आधी घरी धाडा.

तो जरा हट्टी आहे, त्याला सांभाळून घ्या,
ह्या घडीत दुमडलेले काळीज जपून जरा द्या.

माझ्याही डोळ्यात साचलेल्या आसवांच्या रांगा,
त्याला शपथ आहे जाण्याची इतकं फक्त सांगा.

................अमोल