Thursday, February 24, 2011

मला आता कळायला लागलंय

मला आता कळायला लागलंय......
मी ज्यांना आपलं म्हणत होतोत्यांपासूनच मन आता पळायला लागलंय.

आता नकोसा वाटतो सहवास त्यांचा,
नकोसा वाटतो संग,
मी विसरतो आता कि, तेही कधी होते माझ्या भूतकाळातले अंग,
आनंदाचे रंग,
उत्साहाचे तरंग,
आज सारेच बेरंग, बेचिराख.
ते भेटतात तेव्हा मी हसतो फक्त,
पण त्य भेटीत ती तळमळच नसते जी असायची पूर्वी कधी.
आज त्यांच्या दिशेने पडणारं पाऊल आपसूक दूर दूर वळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

आता उरलीच नाहीये ती आर्दता,
ती आर्तता,
ती विश्वासाची पात्रता,
आता... आता त्रास होतो ते झरलेले क्षण आठवातांना,
नि मनाची तयारी नसताना पण कोण्या अज्ञात कारणास्तव शरीराला त्यांच्याकढे पाठवताना
जाता जाता उत्साहाच एक एक पण हळू हळू गळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

मला आवडतात नाती सांभाळायला, गोंजारायला,
त्यांवरती बागडायला, तरंगायला, उडायला,
पण त्यातला आतआतला परकेपणा, खोटेपणा,
यामुळे मला जड झालीयेत हि नाती,
या गाठी,
ज्या मीच बांधल्या होत्या फार दूरच्या क्षणांसाठी,
पण आता वाट्टेल ते कारण सांगून मी निघून येतो तिथनं....
मग त्यांना राग आला तरी चालेल...
उगाच खोटं खोटं हसून मनाला दुखी ठेवण्यापेक्षा एकांतात रडल्याच समाधान तरी भेटेल.
याला माझा पळपुटेपणा म्हणा,
धूर्तपणा म्हणा,
बेफिकिरी म्हणा,
कि म्हणा मला नातीच सांभाळता येत नाहीत,
मला चालेल.....माझा हळवेपणा तुम्हाला कसा कळेल..
हि मनातली तळमळ,
विचारांची खळबळ,
काळजाच्या जखमेची हळहळ तुम्हाला नाही कळणार.
हे सांगतानाही शांत जखमेवरच विस्मरणाच औषधदेखील आता भळभळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

....अमोल

Sunday, February 6, 2011

किनारा.......... लाटेची वाट पहाणारा!!

जातानाचे ठसे होते चार पाऊलखुनांचे ,
येतानाच्या केवळ दोनच होत्या त्या वाळूत,
मी अनुभवलंय ! सागर सारं काही सामावून घेतो.

ओले चिंब अंग विरघळत होते,
समुद्राच्या खारट पाण्यात त्या,
अंगाबरोबर आनंद कधी विरघळला कळलंच नाही.

त्या दिवशीही लाटे सारखाच आवेग होता,
छातीशी येऊनही  धरता आला असा तो क्षण होता,
किनाऱ्याच दुखं मला त्या दिवशी कळलं होतं.

माझं सारं काही त्या लाटेने वाहून नेलं,
सावळीशी मखमलही तळहातावरना तेव्हाच गेली,
लाज सांभाळणारी चुनर केवळ होती माझ्या निर्लज्जपणासाठी.

मी भूतकाळ विसरत चाललोय,
पण ते क्षणच मला विसरत नाहीयेत,
म्हणून तर ते भेटायला येतात आठवण बनून.

किनाऱ्यावरची वाळू अजून दोन परतीच्या पावलांचा हिशेब मागतेय,
त्या दिवसापासून न तेवलेल्या दिव्यांचा सांज जाब विचारतेय,
मी काय करू? काही प्रश्नांना उत्तरच नसतात.

रित आहे संद्याकाळी सूर्यास्त होण्याची,
माझातर चंद्रही तेव्हाच मावळला होता,
दोन अंधार झालेले! एक पुसला गेलाय, एक अजून रुसलाय.

ते म्हणतात कि देव ऐकतो, मी हि हाक मारलेली,
म्हणतात त्याच्या घरी देर आहे, अंधेर नाही,
पण आता मला काय करायचंय.

.....अमोल

Friday, January 28, 2011

तो एक वैरागी संन्यासी

तो एक वैरागी संन्यासी,
मी संसारातला हौशी,
तो उभा त्या पलीकडे,
मी उभा या अलीकडे,
दोघांची वाट समांतर,
चालतो मुक्तीची वाट निरंतर.
तरीही दोघांमध्येही अंतर.

त्याकडे रिकामी झोळी,
मजकडे विचारांची मोळी,
तो शोधतो मोकळे आभाळ,
मी आभाळाखाली छप्पर,
तो मुक्त व्हावया बघतो,
मी मोहाची शोधतो खापर.

तो देव शोधतो एकांती,
मज सदैव असते भ्रांती,
त्यास  भूतकाळातली खंत,
ना भविष्याची चिंता.
मी सोडवतो मात्र सारखा,
त्रीकालातला गुंता.

समोर त्याच्या सदा,
चैतन्याचे दिवे.
उडतात माझ्या समोर,
वासनेचे थवे.
अंतरी त्याच्या त्यागाचे,
सदैव पडती सडे.
सुखाच्या माझ्या कल्पनेला,
वारंवार तडे.
विरक्तीची तोरणे सदा,
त्याचा मंडपी चढे.
नात्याची सूक्ष्म जाळी,
पाय माझा आतून आतून ओढे.

त्याच्या जागेवर तो खरा,
माझ्या जागेवर मी बरा.
दोघं चालत राहू वाट,
पूर्वी होती जशी.
तो एक वैरागी संन्यासी,
मी संसारातला हौशी.


.......अमोल

Saturday, January 22, 2011

स्वर व्याकूळतिचा

असा कधीही ऐकला नाही स्वर व्याकूळतिचा,
दिनकर माध्यानी असता किरण असा मावळतीचा.

भय अस्मानी लाटांचे पैलतीरावर होते,
बेभानपणाचे सूत्र माझ्या शिरावर होते,
वारयाशी अडले नाही शीड माझे कधीही.
वल्हवली नाव सदाच मार्ग विसरून परतीचा.

अडवती मज तेव्हा फास खूप मोहाचे,
हृदयस्पर्शी होते भास सभोवाचे,
मी गुंतलो त्या स्वार्थी स्वप्नात केव्हाही.
आकाश गवसण्या तेव्हा गंध विसरलो मातीचा.

ती रात अंधारी आणि वादळ भयावह होते,
पण जिद्दीने जगण्याचे ते माझे वय होते,
लाटान्नाही चिरले त्या धाउनी आल्या जेव्हाही.
लढलो परी रडलो केला सामना त्या रातीचा.

नव्हता रात्रीस तेव्हा दीपस्तंभ उजळणारा,
त्या पाण्यात होतो एकटाच मी जळणारा.
व्यथा तेव्हा माझी ना विचारली कोणीही.
एकू दिला मीही कोणास स्वर माझा काकुळतीचा.

आपलेच होते आधी तोडण्यास आधार,
निंदेस जोर होता लाऊन जिभेस धार,
यशाने पैलतीरावर जाता तेच ओवाळती मज तेव्हाही,
परी जीव रडत होता वरीवरी त्या हसणाऱ्या वातींचा

अमोल